लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव : भाजपाची उमेदवारी कुणाला हे महत्त्वाचे नसून जिंकणे महत्त्वाचे आहे. पंतप्रधान मोदींमुळे गोव्यात मोपा विमानतळ, अटल सेतू पूल, झुआरी पूल होणे शक्य झाले. दक्षिण गोव्यातील जनतेने भाजपाला का मते द्यावीत कारण येथील प्रत्येक मतदारसंघात केंद्र सरकार अथवा राज्य सरकार मार्फत एकतरी प्रकल्प दिला आहे. काँग्रेसने केवळ जातीभेद, धर्मभेदाचे राजकारण केले. खासदार निधीचा कसा वापर करावा हे दक्षिण गोव्याच्या खासदाराना समजले नाही, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मडगाव येथे केले.
ते भाजपच्या लोकसभा प्रचार कार्यालयाचे उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष खासदार सदानंद तानावडे, भाजपाचे गोवा प्रभारी आशिष सुद, समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई, मडगावचे आमदार दिगंबर कामत, नावेलीचे आमदार उल्हास तुयेकर, वास्कोचे आमदार दाजी साळकर, मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर, माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, माजी खासदार विनय तेंडुलकर, दक्षिण गोवा जिल्हापंचायत अध्यक्षा सुवर्णा तेंडुलकर, माजी आमदार दामोदर नाईक, तुळशीदास नाईक व सर्वानंद भगत उपस्थित होते.
गोव्याचे भाजप प्रभारी आशिष सुद म्हणाले, दक्षिण गोवा भाजपा निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटन गणेश जयंती दिवशी होत असल्याने हा शुभ दिवस म्हणून मानला जातो. संपूर्ण जगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व मान्य केले आहे. मोदी यांना हरविण्यासाठी विरोधीपक्षांनी आघाडी केली होती त्यात बिघाडी झाली.