पणजी - भारतीय जनता पक्षातर्फे पणजी विधानसभा मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री स्वर्गीय मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांनी पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतरावे अशा प्रकारची मागणी भाजपाचे काही कार्यकर्ते करू लागले आहेत. सोशल मीडियावरूनही तशाच सूचना येऊ लागल्या आहेत. पर्रीकर यांचे पुत्र उत्पल यांनी योग्यवेळी याविषयी काय तो निर्णय घेईन, असे शुक्रवारी (29 मार्च) पत्रकारांशी बोलताना म्हटले आहे.
पर्रीकर यांचे निधन होऊन गुरुवारी बारा दिवस पूर्ण झाले. शासकीय दुखवटाही संपुष्टात आला आहे. स्वाभिमानी पणजीवासियांना उत्पल पर्रीकर हेच भाजपाचे पणजीतील उमेदवार म्हणून हवे आहेत अशा प्रकारची मोहीम सोशल मीडियावरून भाजपामधील एका गटाने उघडली आहे. उत्पल हे पोटनिवडणूक लढवतील असे सूतोवाच पर्रीकर यांनी स्वत:च्या हयातीत कधीच केले नव्हते. उत्पल यांचा स्वभाव वडिलांप्रमाणे नाही. ते कधीच राजकारणात सक्रिय नाहीत, त्यांचा स्वभाव त्यांच्या स्वर्गीय आईप्रमाणे सौम्य असल्याचे सगळीकडे म्हटले जाते.
उत्पल यांनी आतापर्यंत यावर काहीच भाष्य केले नव्हते. गुरुवारी पत्रकारांनी त्यांना विचारल्यानंतर ते प्रथमच बोलले. आपण निवडणूक लढवावी अशा प्रकारची चर्चा सोशल मीडियावरून होत आहे हे मला ठाऊक आहे पण मी खरं म्हणजे त्याविषयी अजून विचार देखील केलेला नाही. आम्ही दुखवट्याच्या स्थितीतून आताच बाहेर येऊ पाहत आहोतबारा दिवस पूर्ण झाल्याने धक्क्यातून आम्ही नुकतेच सावरत आहोत. निवडणुकीविषयी योग्यवेळी काय तो निर्णय मी घेईन. लोकांच्या ज्या काही सूचना आहेत, त्यावर निश्चितच विचार केला जाईल पण अजून काही ठरलेले नाही असं उत्पल यांनी म्हटलं आहे.
तुम्हाला भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अविनाश खन्ना यांनी भाजपाचे काम करण्याची विनंती केली आहे काय असे पत्रकारांनी विचारताच आम्ही भाजपाचे काम करतच आहोत, असे उत्पल यांनी सांगितले. बाबा (स्वर्गीय मनोहर पर्रीकर) जेव्हा भाजपाचे काम करायचे, तेव्हा आम्हीही त्यांच्यासोबत त्या कामात सहभागी होत असे उत्पल म्हणाले. 39 वर्षीय उत्पल हे उच्चशिक्षित आहेत. त्यांनी वेर्णा येथील पाद्रे कॉसेसांव कॉलेजमध्ये संगणक विज्ञानाचे शिक्षण घेतले. त्यानंतर अमेरिकेत राहून त्यांनी पदव्युत्तर शिक्षण प्राप्त केले. ते वेर्णा येथे स्वत:चा कारखाना चालवतात. त्यांच्या उद्योगात ऑर्थोपेडीक इम्पलांट्सचे उत्पादन केले जाते.