पणजीः राज्यातील सर्वच ग्रामपंचायतीत आता बायोमेट्रीक पद्धतीच्या हजेरी ऐवजी आर्टीफिशल इंटेलिजन्सवर आधारीत हजेरीची पद्धत लागू केली जाणार असल्याची माहिती पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांनी विधानसभेत दिली.
ग्रामपंचायतीत कर्मचाऱ्यांची कमतरता आणि त्यातही कामावरील गैरहजेरी ही लोकांना त्रासदायक ठरत असल्याचे मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट्ये यांनी सांगितले. यावर मंत्र्यांनी काही तरी तोडगा काढावा. कर्मचाऱ्यांसाठी बायोमेट्रीक हजेरी पद्धत लागू करण्यात येणार असल्याची माहिती मागील विधानसभा अधिवेशनात देण्यात आली होती, परंतु प्रत्यक्षात तसे झाले नाही, असे त्यांनी सांगितले.
त्यावर मंत्र्यांनी सांगितले की बायोमेट्रीक हजेरी पद्धतीलाही लोक चकवा देऊ शकतात असे आढळून आले आहे. त्यामुळे त्या ऐवजी आता बायोमेट्रीक पद्धत न सुरू करता थेट आर्टिफिशल इंटेलिजन्सवर आधारित हजेरी पद्धत लागू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या पद्धतीत कोणत्याही त्रुटी असणार नाहीत. त्यामुळे कर्मचाऱ्यांची कार्यालयातील हालचालही दिसणार आहे. विशेष करून कोणत्या ग्रामपंचायतीत कामाचा अधिक भार आहे आणि कोणत्या ग्रापंचायतीत कामाचा कमी बार आहे, त्या अनुशंगाने कोणत्या पंचायतीत अधिक कर्मचारी आहेत आणि कोणत्या पंचायतीत कमी आहेत याची माहिती थेट मिळणार आहे. त्यामुळे आवश्यक त्या ठिकाणी कर्मचारी पाठविणे शक्य होणार आहे असे मंत्री गुदिन्हो यांनी सांगितले.