लोकमत न्यूज नेटवर्क पणजी: मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर ब्ल्यू टॅक्सींचा मार्ग मोकळा झाला आहे. गोवा मोटर वाहन कायद्यात त्यासाठी दुरुस्ती करणारी अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
निळ्या रंगाच्या या टॅक्सी प्रिपेड सेवा देतील. नव्या संकल्पनेच्या या टॅक्सींना परमिट देणे, विमानतळावर या टॅक्सींसाठी काउंटर उघडणे याबाबत काही अडचणी होत्या. त्यासाठी कायदा दुरुस्ती अनिवार्य ठरली होती. गेल्या २३ मे रोजी वाहतूक संचालकांनी अधिसूचना मसुदा जाहीर करुन १५ दिवसांच्या कालावधीत हरकती, सूचना मागवल्या होत्या.
संचालक राजन सातार्डेकर यांनी अंतिम अधिसूचनेत म्हटल्याप्रमाणे योग्य सूचना, हरकती विचारात घेऊन आवश्यक ते सुधार करण्यात आले आहेत. दरम्यान, टॅक्सी चालकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. ट्रॅफिक सिग्नल, पर्यटक आणि प्रवाशांशी कसे वागावे याबाबत दोन आठवड्यांचे प्रशिक्षण मोफत आणि सक्तीचे असेल.
१६० टॅक्सी धावणार
मोपा विमानतळावर १६० ब्ल्यू टॅक्सी लवकरच सुरु केल्या जातील. दुसरीकडे गोवा माइल्स टॅक्सी भाडे सरकारने अधिसूचित केलेल्या दरांपेक्षा १५ ते २० टक्क्यांनी कमी केले आहे. मोपा विमानतळावर ब्लू टॅक्सी सरकारने ठरवून दिल्याप्रमाणे भाडे आकारणार आहेत.