ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. 26 - गोव्यात येत्या दिवाळीत गुजरातमधून ६८ पर्यटकांना घेऊन चार्टर विमान येणार आहे त्यानंतर पर्यटकांसाठी ही सेवा चालूच राहणार असल्याची माहिती पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर यांनी ‘लोकमत’ला दिली. देशातील अन्य राज्यांमधून गोव्यात चार्टर विमाने सुरु होण्याची ही पहिलीच घटना ठरणार आहे.
देश, विदेशी पर्यटकांसाठी गोवा हे नंदनवन ठरले आहे. पावसाळ्यातही गोव्यात देशी पाहुण्यांची गर्दी दिसत आहे. पर्यटन खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार दरवर्षी सुमारे ३0 लाख देशी पर्यटक गोव्याला भेट देत असतात. पावसाळ्यात गोव्यात येणारे पर्यटक अधिकतर गुजरात, राजस्थान, दिल्लीतील म्हणजेच खास करुन उत्तर भारतीयच जास्त असतात.
मास्टर प्लॅनसाठी सूचना मागविल्या
दरम्यान, पर्यटन मास्टर प्लॅनसाठी जनतेकडून तसेच पर्यटन व्यावसायिक, बिगर शासकीय संघटना यांच्याकडून सूचना मागविण्यात आल्या आहेत. पर्यटन क्षेत्रात स्वयंपोषक विकासासाठी पाच वर्षांचा लघू मुदतीचा, १५ वर्षांचा मध्यम मुदतीचा आणि २५ वर्षांचा दीर्घ मुदतीचा मास्टर प्लॅन तसेच पर्यटन धोरण निश्चित करण्यात येत आहे.