पणजी : तंबाखुजन्य पदार्थांच्या पाकिटांवर वैधानिक इशारा देण्याबाबत नवी मार्गदर्शक तत्त्वें आरोग्य मंत्रालयाने अधिसूचित केली आहेत. तंबाखुच्या व्यसनापासून मुक्त होण्यासाठी प्रथमच पाकिटावर १८00-११-२३५६ हा हेल्पलाइनचा क्रमांक टाकावा लागेल. तंबाखुमुळे कर्करोग होतो तसेच वेदनादायक मृत्युलाही सामोरे जावे लागते, असे ठळक अक्षरात लिहिणे तसेच पाकिटावर तशी चित्रे असणे सक्तीचे आहे.
राष्ट्रीय तंबाखु निर्मूलन संघटनेचे अध्यक्ष डॉ. शेखर साळकर यांनी ही माहिती दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार हेल्पलाइनचा क्रमांक काळ्या रंगाच्या पार्श्वभूमीवर सफेद रंगात लिहिणे तसेच वैधानिक इशा-याच्या ओळी लाल रंगाच्या पार्श्वभूमीवर सफेद रंगात लिहाव्यात, असे या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये म्हटले आहे. अधिसूचनेनुसार वैधानिक इशा-याबरोबर दोन चित्रे असणे आवश्यक आहे. साळकर पुढे असेही म्हणतात की, चित्र याआधीही सक्तीचे होते. सर्वेक्षणात ६२ टक्के सिगारेट व ५४ टक्के विडी धुम्रपान करणा-यांनी असे सांगितले की, चित्रांद्वारे वैधानिक इशारा देण्यात आल्याने सेवन सोडण्याचा विचार मनात आला.
डॉ. साळकर हे कर्करोगतज्ञ असून येथील मणिपाल इस्पितळात आॅन्कॉलॉजी विभागाचे प्रमुख आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार अशा वैधानिक इशा-यामुळे लोकांमध्ये तंबाखु सेवनातून आरोग्याला असलेल्या धोक्याबाबत जागृती निर्माण होते. भारतात अनेक भाषा आणि बोली भाषा आहेत. त्यामुळे दोन चित्रांसह वैधानिक इशारा दिल्यास तो उपयुक्त ठरणार आहे.