लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : राज्यात सलग १० दिवस जोरदार पाऊस पडत असल्याने राज्यातील धरणे तसेच नद्या तुडुंब भरून वाहत आहेत. सोमवारी काही काळाची उघडीप दिल्यानंतर पुन्हा पाऊस बरसला. दिवसभरात काही ठिकाणी १.५ इंच तर मडगावात तब्बल तीन इंचाहून अधिक पाऊस पडला. पावसाने आतापर्यंत ८८ इंचांचा आकडा पार केला आहे.
मुसळधार पावसाची शक्यता असल्याने हवामान खात्याने २६ जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. गोवा हवामान खात्याने आज मंगळवारी आणि उद्या बुधवारी केसरी अलर्ट जारी केला आहे. तर त्यापुढील चार दिवस पिवळा अलर्ट आहे. त्यामुळे पुढील आठवडाभर जोरदार पावसाची शक्यता आहे. गेले पंधरा दिवस संततधार पाऊस पडत असल्याने याच फटका सर्वांना बसला असल्याने याच फटका सर्वांना बसला आहे.
१ जून ते आतापर्यंत सर्वाधिक जास्त पाऊस सांगे केंद्रात झाला आहे. सांगे केंद्रात एकूण ९३ इंच पावसाची नोंद झाली. तर केपे ८७.८ इंच, मडगाव केंद्रात ८७ इंच पाऊस झाला आहे. राजधानी पणजीत आतापर्यंत ७९ इंच पावसाची नोंद झाली आहे.
जनजीवन विस्कळीत
मुसळधार पाऊस पडत असल्याने पुराने लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. उत्तर गोव्यात डिचोली, साळ भागात आणि दक्षिण गोव्यात केपे, सांगे, मडकई परिसरात अनेकांची जुनी मातीची घरे पावसाने कोसळली आहेत. तर अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरल्याने घरगुती साहित्याचे नुकसान झाले आहे. शेती- बागायतीचे मोठे नुकसान झाले असून झाडे कोसळण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.
धरणे भरली
राज्यातील साळावली, आमठाणे तसेच तिळारी धरण भरल्याने धरणाचे पाणी सोडण्यात आले आहे. राज्यातील बहुतांश नद्यांवर पूर आल्याने त्या धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहेत. रविवारी दिवसभर पाऊस झाला आहे. काल सोमवारी पावसाचा जोर सुरूच होता. सरकारने आपत्कालीन व्यवस्थापन समितीला सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे अग्निशमन दल, पोलिस, आपत्कालीन सेवांकडून परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे.