पणजी : सरकारच्या वेगवेगळ्या संकेतस्थळांवर नजर ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी गोवा इलेक्ट्रॉनिक लिमिटेडला दिले आहेत. कला अकादमीची माहिती शोधण्यासाठी सरकारी संकेतस्थळाला भेट दिली असता कलाप्रेमींना जपानी संकेतस्थळ उघडते आणि आरोग्यविषयक माहिती तेथे उपलब्ध होते. कलाप्रेमींच्या याबाबत अनेक तक्रारी आल्या आहेत. हा प्रकार लक्षात आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालून वरील आदेश दिले आहेत.प्रत्येक सरकारी खात्याने वेळोवेळी त्यांची परिपत्रके तसेच अन्य आदेश अधिसूचना संकेतस्थळावर अपलोड करावे, असे निर्देश दिलेले आहेत. सरकारच्या प्रत्येक खात्याची वेबसाइट आहे, तसेच सरकारची स्वतंत्र व्यवसाय वेबसाईट आहे. या संकेतस्थळांवरील माहिती अनेक वेळा जुनीच असते. वेळोवेळी ती अपडेट केली जात नाही. सरकारी खात्यांमध्ये दैनंदिन तत्त्वावर परिपत्रके अधिसूचना आदेश काढले जातात.नागरिकांना त्याची माहिती होणे आवश्यक आहे. अधिकार्यांच्या बदल्या केल्या जातात त्याची माहिती निदान महिनाभराच्या कालावधीत तरी संकेतस्थळावर यायला हवी. माहिती अपडेट होणे गरजेचे आहे, परंतु ती अपडेट केली जात नाही. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर आता स्वतंत्र पथक तयार करण्यात येणार असून हे पथक प्रत्येक संकेतस्थळाचा आढावा घेणार आहे. गोवा इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड राज्य सरकारच्या सर्वसाधारण प्रशासन विभागाकडे समन्वय साधणार असून वेळोवेळी माहिती अपडेट होईल याची काळजी घेतली जाईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
सरकारच्या वेगवेगळ्या संकेतस्थळांवर आता गोवा इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडची नजर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2018 2:06 PM