पणजी : गोव्यात गृहनिर्माण मंडळाकडून ‘शीयर वॉल टेक्नॉलॉजी’ या नव्या तंत्रज्ञानाने बांधलेली घरे लोकांना उपलब्ध केली जाणार आहेत. आंध्र प्रदेशात अशा पध्दतीची नव्या तंत्रज्ञानाची घरे गरजूंना माफक दरात उपलब्ध करण्यात आली आहेत. गोव्याचे गृहनिर्माणमंत्री जयेश साळगांवकर यांनी रविवारी आंध्रातील नेल्लूर येथे या घरांची पाहणी केली.
बांधकामाच्या पारंपरिक मार्गांना फाटा देत अद्ययावत तंत्रज्ञानाव्दारे मजबूत आणि टिकावू अशी नवी पध्दतीची बांधकामे आंध्र प्रदेशमध्ये आलेली आहेत. ही एक अशी प्रणाली आहे ज्याची रचना स्ट्रक्चरल पॅनेलवर बनलेली असते. वारा आणि भूकंपाचा भार सहजतेने या इमारती पेलतात. पोलादाच्या वापरामुळे पटल मजबूत बनते आणि भूकंपाचा प्रतिकार करणे शक्य होते. स्लिप फॉर्मिंग कॉक्रीट प्लेसमेंटची पद्धतही येथे वापरली जाते.
‘शीयर वॉल टेक्नॉलॉजी’ या नव्या तंत्रज्ञानाने बांधलेल्या इमारतींची पाहणी करण्यासाठी आंध्र प्रदेशच्या दौ-यावर गेलेल्या शिष्टमंडळात गोवा गृहनिर्माण मंडळाचे अभियंते, अधिकारीही सहभागी झाले होते.
‘गोव्यात गरीब, गरजू लोकांना अशा पध्दतीची घरे बांधून देण्याबाबत पावले उचलू,’ असे मंत्री साळगांवकर यांनी ‘लोकमत’ला फोनवरुन सांगितले. आंध्रप्रदेशमध्ये नेल्लूर येथे सुमारे १0 हजार सदनिका बांधण्यात आल्या आहेत. रिइन्फोर्सड काँक्रिटच्या भिंती बांधल्या जातात आणि त्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञान वापरले जाते. दहा वर्षांपूर्वी अमेरिकेत हे तंत्रज्ञान वापरले जात होते. अलीकडेच ते भारतात आलेले आहे. हाय टेक बांधकाम असले तरी आर्थिकदृष्ट्या परवडणारे आहे. गोव्यात सुरवातीच्या काळात ४५ चौरस मिटर आणि ६५ चौरस मिटरच्या सदनिका बांधण्याची योजना आहे.
साळगांवकर म्हणाले की, आंध्रात त्यांना रेती मोफत मिळालेली आहे तसेच जमीनही सरकारच्या मालकीची आहे. गोव्यात या गोष्टी कशा काय साध्य होतात हे पहावे लागेल आणि त्यानंतरच दर आणि अन्य बाबी ठरतील. केंद्राच्या प्रधानमंत्री आवास योजनेखाली तसेच गोव्यात अनुसूचित जमातींसाठी असलेल्या अटल आसरा योजनेखाली अर्थसाहाय्य मिळवून आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकातील लोकही या सदनिका खरेदी करु शकतात.’, असे साळगांवकर यांनी सांगितले.
नेल्लूर येथे तीन मजली इमारती अशाच पध्दतीने सरकारने बांधल्या असून सुमारे १0 हजार कुटुंबांची सोय केली आहे. तेलंगणामध्येही हुडकोकडून १५ हजार कोटी रुपये कर्ज घेऊन सरकारने अशीच घरे बांधलेली आहेत. तेलंगणात ३00 चौरस फुटाच्या सदनिकेसाठी २ लाख ६५ हजार रुपये, ३६५ चौरस फूटाच्या सदनिकेसाठी ३ लाख ६५ हजार रुपये आणि ४३0 चौरस फुटांच्या सदनिकेसाठी ४ लाख ६५ हजार रुपये दर आकारण्यात आलेला आहे.