पणजी : बाबूश मोन्सेरात यांची पक्षातून हकालपट्टी झाल्यानंतर आमदार माविन गुदिन्हो यांचा क्रमांक लागणार असल्याचे सुतोवाच काँग्रेसचे प्रवक्ते तथा सरचिटणीस सुनील कवठणकर यांनी केले आहे. त्यापूर्वीच हिंमत असल्यास गुदिन्हो यांनी राजीनामा द्यावा, असे आव्हानही त्यांनी दिले आहे. पक्षावर वारंवार टीका करणाऱ्या काँग्रेस आमदारांची पक्षाकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. योग्यवेळी त्यांच्यावर कारवाई केली जाईल. बाबूश मोन्सेरात यांच्या बडतर्फीवर शिक्कामोर्तब झाल्यानंतर गुदिन्हो यांचा विषय हाती घेतला जाणार आहे, असे कवठणकर यांनी सांगितले. माविन गुदिन्हो हे काँग्रेसने आपल्यासाठी काहीच केले नाही, अशी जी टीका करीत आहेत, त्याचे खरे कारण वेगळे असल्याचा कवठणकर यांनी दावा केला. वीज घोटाळ्यात त्यांच्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात खटला चालू आहे. संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी त्यांच्याविरुद्ध तक्रार केली होती. हे प्रकरण अंगावर शेकू नये, यासाठी माविनची धडपड चालू असल्याचा आरोप त्यांनी केला. मुरगाव गटसमितीचे अध्यक्ष आणि आता महासचिव म्हणून नियुक्त केलेले वामन चोडणकर यांनीही माविन यांना लक्ष्य करताना, हिंमत असल्यास त्यांनी पक्षसदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा द्यावा, असे सांगितले. काँग्रेसमुळेच माविन आमदार होऊ शकले, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
आता माविन गुदिन्होंचा नंबर!
By admin | Published: February 20, 2015 1:28 AM