पणजी - देशाचे संरक्षणमंत्रीपद तसेच गोव्याचे मुख्यमंत्रीपद भूषविलेले दिवंगत मनोहर पर्रीकर यांच्या पर्रा गावात पर्यटकांना फोटो किंवा व्हिडीओ काढण्यासाठी यापुढे पैसे भरावे लागणार आहेत. पर्रा पंचायतीने यापुढे पर्यटकांना फोटोसाठी 100 रुपये शुल्क आकारण्याचे ठरविले आहे. स्वच्छता कराच्या नावाखाली हा कर लागू करण्यात आला असून तो चर्चेचा विषय ठरला आहे.
पर्रा ग्रामपंचायतीच्या सरपंच श्रीमती डिलायला लोबो यानी यास दुजोरा देताना अस्वच्छता करणाऱ्या पर्यटकांना चाप लावण्यासाठीच हे शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. काही पर्यटक फोटो काढण्यासाठी रस्त्याच्या मधोमध वाहने पार्क करतात त्यामुळे वाहतूक कोंडी होते. मोठ्याने संगीत लावतात तसेच दारु पिऊन धिंगाणा घालतात, दारु पिऊन शेतांमध्ये बाटल्या फेकतात, अशा तक्रारी त्यांनी केल्या. पंचायतीसमोर यामुळे स्वच्छतेच्या बाबतीत अनेक अडचणी येतात.
भातशेती, माडांच्या बनांनी समृद्ध असलेल्या या गावात बॉलिवूडसाठी अनेकदा चित्रीकरण झालेले आहे आणि हिंदी सिनेमांमध्ये हे गाव झळकलेलं आहे. पर्यटक कचरा टाकतात त्यामुळे अस्वच्छता निर्माण होते. काही पर्यटक मद्यप्राशन करतात आणि बाटल्या उघड्यावर टाकतात. पर्रा गावांतील विहंगम दृश्य असलेल्या रस्त्यावर अनेक चित्रपटांचे चित्रीकरण झालेले आहे. दोन दिवसांपूर्वी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला त्यात फोटोसाठी पर्यटकांकडे शुल्क आकारणी केली जात असल्याचे दाखवले होते. अशा पध्दतीच्या निर्बंधांमुळे गोव्याला भेट देणेही कठीण होईल, अशी नाराजी या पर्यटकांनी व्यक्त केली आहे.