लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : 'चवथ इ बाजार'च्या धर्तीवर येत्या दसऱ्याला 'स्वयंपूर्ण ई बाजार' सुरू केली जाणार असून, गोव्यातील महिला स्वयंसाहाय्य गटांच्या उत्पादनांना देशभरात बाजारपेठ मिळवून दिली जाईल, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी जाहीर केले.
'स्वयंपूर्ण गोवा, आत्मनिर्भर भारत' उपक्रमाला तीन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त मुख्यमंत्र्यांनी काल स्वयंपूर्ण मित्र, सरपंच, पंच, झेडपी यांच्याशी ऑनलाइन संवाद साधला. याप्रसंगी त्यांच्यासोबत नियोजन व सांख्यिकी खात्याचे संचालक विजय सक्सेना, आरडीएचे संचालक भूषण सावईकर, आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, अंत्योदय, सर्वोदय, ग्रामोदय तत्त्वावर विकास घडवून आणण्यासाठी सरकार कटिबद्ध असन, 'स्वयंपूर्ण गोवा आत्मनिर्भर भारत' कार्यक्रम आम्ही अंत्योदय विचारधारेवर प्रत्येकापर्यंत पोहोचवला. राज्य व केंद्र सरकारच्या प्रत्येक योजना लोकांपर्यंत पोहोचवाव्यात. त्यांच्या समस्यांचे निराकरण व्हावे हा हेतू होता. आता स्वयंपूर्ण ०.२ उपक्रमांतर्गत महिला, युवा वर्गाच्या कौशल्य, पुनकौशल्यावर भर दिला जात आहे. ग्रामीण महिलांना उद्योजकतेसाठी प्रोत्साहन दिले जात आहे.
दोन ठराव घेण्याचे आवाहन
महिलांना विधानसभा व लोकसभेत आरक्षण देण्यासंबंधीचे विधेयक संसदेत संमत केल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे अभिनंदन करणारा. तसेच 'चंद्रयान'चे यशस्वी लँडिंग झाल्याबद्दल शास्त्रज्ञांचे अभिनंदन करणारा असे दोन ठराव ग्रामपंचायतींनी संमत करून पंचायत खात्याला पाठवावेत, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. हे ठराव नंतर अनुक्रमे पंतप्रधान कार्यालय व इस्रोला पाठविले जातील.