लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : राज्यातील वाहतूक क्षेत्रात मोठी क्रांती आणण्याच्या दिशेने सरकारने पाऊल टाकले आहे. यात गोवा माईल्सचा सिहांचा वाटा आहे. गोवा माईल्सने आता मल्टीमोडल अॅप अस्तित्वात आणून गोमंतकीयांना सोप्या पध्दतीने वाहतूक सेवा उपलब्ध करुन दिली आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
कदंब वाहतूक महामंडळच्या सहाय्याने गोवा माईल्सतर्फे मल्टीमोडल ॲपचे अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल करण्यात आले. यावेळी वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो, कदंब महामंडळाचे अध्यक्ष आमदार उल्हास तुयेकर, सरव्यावस्थापक संजय घाटे, व्यवस्थापकीय संचालक डेरीक परेरा नेटो, वाहतूक संचालक राजन सातार्डेकर, गोवा माईल्सचे उत्कर्ष धबाले व इतर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी सरकारची टॅक्सी पात्राव योजना आणि गोवा माईल्स यांच्यात करार देखील करण्यात आला.
मल्टीमोडल अॅपद्वारे राज्यातील वाहतुकीमध्ये मोठा बदल दिसणार आहे. अजुनही अनेकांना बससाठी आपल्या घराकडून दोन ते अडिच किलोमिटर चालत यावे लागते, याची मला जाणीव आहे. परंतु मल्टीमोडल अॅपच्याद्वारे केव्हा, कुठेही वाहतूक सेवा लोकांना उपल्बध होणार आहे. टॅक्सीसोबत पायलट, रिक्षा व बससेवा देखील गोवा माईल्स देणार आहे, असे डॉ. सावंत यांनी पुढे सांगितले.
बससाठी दोन ते अडीच किलोमिटर चालत यावे लागते. परंतु या अॅपच्याद्वारे केव्हा, कुठेही वाहतूक सेवा उपलब्ध होणार आहे. टॅक्सीबरोबर पायलट, रिक्षा व बससेवा गोवा माईल्स देणार आहे.
१०० कोटींची गुंतवणूक
गोवा माईल्स येणाऱ्या वर्षात राज्यातील वाहतूक क्षेत्रात १०० कोटींची गुतवणूक करणार आहे. टॅक्सीमालक स्थानिकच असणार, पण गोवा माईल्स त्यांना टॅक्सी घेण्यास मदत करणार. पुढच्या वर्षी २४ तास सेवा पुरवणारे ८५० टॅक्सी कार्यरत असतील. तसेच आताचे पायलट आणि रिक्षाचालकांकडून त्यांची जुनी वाहने घेऊन त्यांना ई वाहने देण्यात येणार आहेत. २०३० पर्यंत राज्याला झिरो कार्बन राज्य बनविण्यावर भर देण्यात येईल.
काय आहे ॲप ?
मल्टीमोड अॅपच्या साहाय्याने बस किंवा इतर कुठलेही वाहन कोणत्याही वेळी बूक करता येणार आहे. बुकींग केल्यानंतर ती नेमकी कुठे पोहचली आहे, याबाबतचा ट्रॅक ठेवता येणार आहे. भाड्याचे दर कि.मी प्रमाणे ठरविण्यात आलेला असेल, तसेच ऑनलाईन पध्दतीने भाडे भरता येईल.
गोवा माईल्सने आज वाहतूक क्षेत्राला नविन दिशा दिली आहे. पुढच्या ६ महिन्यानंतर याचा परीणाम दिसणार आहे. कदंब महामंडळचा देखील महत्वाचा वाटा आहे. यातून उच्च स्तरावरील पर्यटक राज्यात येणार आहे. -माविन गुदिन्हो, वाहतूकमंत्री.
सरकारला जशी वाहतूक व्यावस्था हवी आहे, तशी आम्ही देण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच स्थानिकांनाच यातून रोजगार प्रदान करण्यावर भर दिला आहे. सर्वांना सोबत घेऊन राज्याचा विकास साधने हेच ध्येय. - उत्कर्ष धबाले, प्रमुख, गोवा माईल्स