मडगाव (गोवा), दि. 14 - सरकारी सेवा ऑनलाइन झाल्या असल्या तरी त्यांच्या वापरापासून सामान्य जनता अद्यापही कोसो मैल दूर आहे. या सेवांबद्दल लोकांच्या मनात शंकाही आहेत. या शंका दूर करण्यासाठी गोवा सरकारने आता ‘ग्रामीण मित्र’ योजना हाती घ्यायची ठरविले असून या योजनेअंतर्गत सरकारी अधिकारी गावात जाऊन लोकांना या सेवा कशा वापराव्यात याचे प्रशिक्षण देणार आहेत.
येत्या ऑक्टोबर महिन्यापासून गोव्यात ही योजना सुरु होणार आहे. गोव्याचे माहिती तंत्रज्ञान (आयटी) मंत्री रोहन खवंटे यांनी ही माहिती दिली. हे अधिकारी ई-यंत्रणा घेऊन ग्राम पातळीवर जाणार असून लोकांची कामे तिथल्या तिथे करुन देणार आहेत असे ते म्हणाले. गोवा राज्यात दोन जिल्हे असून हे दोन्ही जिल्हे ‘ई-जिल्हे’ म्हणून जाहीर केले असून प्रत्येक तालुका पातळीवर ई-सेवा उपलब्ध करण्यात आली आहे. येत्या महिन्यापासून या सेवांना गती देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, गोव्यातील कुळ व मुंडकार दावे त्वरित हातावेगळे करण्यासाठी मामलेदार स्तरावर ‘शनिवार न्यायालये’ राज्यात सुरु करण्यात आली असून ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून दोन्ही जिल्ह्यात ही न्यायालये सुरु होतील, असे त्यांनी सांगितले. सध्या गोव्यातील कूळ मुंडकार खटले दिवाणी न्यायालयातून काढून घेऊन पुन्हा मामलेदार न्यायालयात वर्ग केली आहेत. या पार्श्वभूमीवर गोव्यात हा निर्णय घेण्यात आला आहे.