लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : हर घर फायबर योजनेअंतर्गत प्रत्येक घर इंटरनेटने जोडण्यात येत असून पाच मतदारसंघांमध्ये मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते व्हर्चुअल पद्धतीने दहा वाय-फाय हॉटस्पॉट सुरू करण्यात आले. या सर्व ठिकाणी मोफत वाय-फाय वापरता येईल. राज्यभरात असे ७५ वाय-फाय हॉटस्पॉट होणार असून त्यामुळे इंटरनेट कनेक्टिव्हिटीची समस्या दूर होईल, असा दावा केला जात आहे.
साखळी, पर्वरी, ताळगाव, बाणावली व डिचोली मतदारसंघांमध्ये वाय-फाय सुरू झालेले आहे, असे सांगण्यात आले. येत्या काही महिन्यांमध्ये अन्य मतदारसंघांमध्येही वाय-फाय सुरू होतील. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत हा उपक्रम होत आहे. यामुळे लोकांना डिजिटल कनेक्टिव्हिटी सुलभतेने मिळेल.
आयटी मंत्री रोहन खंवटे म्हणाले की, 'गेल्या विधानसभा अधिवेशनात जाहीर केल्याप्रमाणे मी वाय-फाय सेवा सुरू केले आहे. प्रत्येक आमदाराला त्यांच्या मतदारसंघातील दोन विभाग सुचवण्यास सांगितले आहे. सर्व सार्वजनिक ठिकाणे तसेच सरकारी कार्यालये वाय-फायखाली आणली जातील. बहुतांश लोक आता ऑनलाइनच व्यवहार करीत असल्याने इंटरनेट कनेक्टिव्हीटी मूलभूत गरज बनली आहे. प्रत्येक घराला कनेक्टिव्हीटी देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
पेडणेत सिटीझन सर्व्हिस सेंटर
- दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पेडणेत सिटीझन सर्व्हिस सेंटरचे व्हर्चुअल उद्घाटन केले. हे आठवे सिटीझन सेंटर आहे.
-आयटी महामंडळाचे अध्यक्ष आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर यावेळी उपस्थित होते.
- निवास दाखला किंवा अन्य प्रकारचे दाखले मिळवण्यासाठी तसेच वीज, पाणी बिले आदी बिले भरण्यासाठी ही केंद्रे नागरिकांना मदत करतील. ३५ खात्यांमार्फत साडेपाच लाख लोकांना आतापर्यंत अशा सेवेचा लाभ दिला आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"