पणजी - रस्त्यावरील वाहनचालकांकडून करण्यात येणारी वाहतूक नियमांची उल्लंघने आता थेट आॅनलाईन नोंदविणे लोकांना शक्य होणार आहे. त्यासाठी गोवा पोलीस खात्याने विशेष एण्ड्रॉयड अॅप बनविले असून त्याचे लोकार्पण गोव्याच्या राज्यपाल मृदुला सिन्हा यांच्या हस्ते गुरूवारी होणार आहे. नवीन अॅप हे गोव्यात ट्रॅफीक सेन्टिनल म्हणून वाहतूकीची उल्लंघने रोखण्यासाठी वावरणाऱ्यांसाठी विशेषत: बनविण्यात आले आहे. एखादे उल्ल्ंघन सेन्टीनलने आपल्या मोबाईलद्वारे टीपले की ल गेच ते अॅपवर अपलोट करण्याची सुविधा त्यात उपलब्द करण्यात आली आहे. त्यामुळे उल्लंघनांची नोंदणी तात्काळ होवून तात्काळ त्यावर कारवाईची पत्रे वजा चलने पोलीस खात्याच्या वाहतूक विभागाकडे संबंधित वाहनाच्या मालकाला पाठविणे शक्य होणार आहे. विद्यमान परिस्थितीत ट्रॅफीक सेन्टीनल टीपण्यात आलेली उल्लंघने पोलीस खात्याच्या वाहतूक विभागाला इमेल किंवा व्हॉटसेपच्या माध्यमातून पाठवित आहेत. या उल्लंघनांची नंतर छाननी करणे अधिक उल्लंघने पाठविणारा सेन्टीनल ठरविणे वगैरे कामे करण्यासाठी खूप वेळ जात होता. यापूढे अॅपवरच त्याची माहिती मिळणार असल्याने वाहतूक विभागाचाही वेळ वाचणार आहे. वाहतूक विभागाच्या सूत्रांकडून ही माहिती देण्यात आली. गुरूवारी संध्याकाळी ४ वाजता पणजी पोलीस मुख्यालयात एका विशेष समारंभात हे अॅप लोकांसाठी खुले करून दिले जाणार आहे. दरम्यान गोवा सेन्टीनल योजना सुरू केल्यास एक वर्ष पूर्ण होत आहे. एका वर्षाच्या आढाव्यानंतर ही योजना खूप फायदेशीर ठरत असल्याचे दिसून येत आहे. कारण मागील १० महिन्यात रस्ता अपघातांची संख्या आणि अपगाती मृत्युंची संख्याही २२ टक्क्यांनी घटली असल्याचे पोलीस महासंचालक मुक्तेश चंदर यांनी म्हटले आहे. १ जानेवारी ते ३१ आॅक्टोबर २०१७ वर्षाच्या तुलनेत यंदा म्हणजे १ जानेवारी ते ३१ आॅक्टोबर २०१८ या वर्षी या दहा महिन्याच्या कालावधीत ६० अपघाती मृत्यू कमी झाले आहेत. गेल्यावर्षी १ जानेवारी ते ३१ आॅक्टोबर या काळात २७२ अपघाती मृत्यु झाले होते. यंदा या दहा महिन्यांच्या काळात ही संख्या २१२ एवढी आहे. म्हणजेच २२ टक्यांनी अपघाती मृत्युंची संख्या खाली आली आहे. या सकारात्मक बदलात गोवा सेन्टीनल योजनेचेही योगदान असल्याचे मुक्तेश चंदर यांनी म्हटले आहे.
आता वाहतूक नियमांचे उल्लंघन रोखा आॅनलाईन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2018 4:48 PM