मडगाव : कोरोनामुळे राज्यात संचारबंदी लागू झाल्याने सर्व प्रकारची वाहतूक ठप्प झाली आहे. याचा फटका परप्रांतीयांना बसू लागला आहे. बसही नाही आणि रेल्वेही नाही, अशा कात्रीत सापडलेले शंभरांपेक्षा अधिक परप्रांतीय मडगावच्या रेल्वेस्थानकावर अडकून पडले असून, आम्ही आता घरी कधी पोहोचू हीच चिंता त्यांना सतावू लागली आहे. जिल्हा प्रशासनाने यात लक्ष घालावे, अशी मागणी आता होऊ लागली आहे.मागचे दोन दिवस ते येथे अडकून पडले असून, राहण्यासाठी त्यांनी रेल्वेस्थानकाचा आश्रय घेतला होता. मात्र, आता त्यांना रेल्वेस्थानकावरूनही पोलीस हाकलून लावू लागले आहेत. त्यामुळे त्यांची परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे.मिळालेल्या माहितीप्रमाणे, यातील काही जण महाराष्ट्रातील असून, काही जण कर्नाटक राज्यातील आहेत. त्याशिवाय हैदराबाद, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश यासारख्या दूरच्या शहरांतीलही लोक येथे अडकून पडले असून, खाद्यपदार्थाची दुकानेही बंद झाल्याने त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे. त्यांचे हे हाल पाहवले जात नसल्यामुळे काही स्थानिकांनी त्यांना जेवणही पुरविले.या प्रवाशांपैकी हैदराबादच्या एस. जयकुमार याने प्रसारमाध्यमांशी बोलताना आपली व्यथा व्यक्त केली. तो म्हणाला, मी काही कामासाठी पणजीला आलो होतो. हैदराबादला जाणाऱ्या सर्व बस बंद झाल्याने कदाचित रेल्वे मिळेल या आशेने मडगावला आलो होतो; पण येथेही मी अडकून पडलो. आता घरी कसे जावे हेच मला कळत नाही.आणखी एका प्रवाशाने गोव्यात अडकल्यामुळे आपण एका लॉजचा आसरा घेतला होता. मात्र, लॉजही बंद झाल्यामुळे मी अशरक्ष: रस्त्यावर पडलो, असे त्याने सांगितले. या प्रवाशांना गोव्यातील तियात्रिस्त तौसीफ द नावेली यानेसोमवारी जेवणाची व्यवस्था केली होती. अन्य काही लोकांनीही त्यांना मदत केली.स्थानिक नगरसेवक अविनाश शिरोडकर यांनी या अडकलेल्या प्रवाशांची व्यथा विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांच्या कानावर घातली असता, कामत यांनी दक्षिण गोव्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी सुरेंद्र नाईक यांच्याशी संपर्क साधून या लोकांना मदत करण्याची मागणीकेली. प्रशासनाने या गोष्टीत लक्ष घालण्याचे आश्वासन दिले असल्याचे कामत यांनी ‘लोकमत’लासांगितले.प्रशासनाकडून जेवणाची व्यवस्थाजिल्हा प्रशासनाने या अडकलेल्या प्रवाशांची दखल घेत त्यांच्या दुपारच्या जेवणाची व्यवस्था केली. या लोकांना दुसरीकडे हलविण्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत, अशी माहिती सासष्टीचे मामलेदार प्रताप गावकर यांनी दिली.याच लोकांची नव्हे, तर रस्त्यावर उपाशी असलेल्या अन्य लोकांनाही प्रशासनातर्फे जेवण देण्याची व्यवस्था केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
Coronavirus : आता आम्ही घरी पोहोचणार तरी कधी?, मडगाव रेल्वेस्थानकावर अडकले शंभरावर अधिक परप्रांतीय
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2020 2:50 AM