पणजी : गोमेकॉची नर्स असल्याची फेसबुकवर बोगस प्रोफाइल करून एनआरआयना लुटणाऱ्या वेळ्ळी येथील ३६ वर्षीय महिलेला सायबर विभागाने अटक केली आहे. चित्रपटातील कथानकांसारख्या कहाण्या रचून या महिलेने दोघा युवकांना ५.६० लाख रुपयांना गंडा घातला आहे. या महिलेचे नाव पोलिसांनी जाहीर केले नाही. गोमेकॉत काम करणारी २१ वर्षीय नर्स असल्याची प्रोफाइल तिने बनविली होती. एका तरुण मुलीच्या फोटोचा वापरही करण्यात आला होता. विदेशात नोकरीला असलेल्या गोव्यातील युवकांना ही युवती लक्ष्य बनवत होती. अशा युवकांशी दोस्ती करून त्यांच्यात विश्वास निर्माण करणे हे तिचे पहिले उद्दिष्ट होते. त्यानंतर अचानक कधी तरी आपण फार मोठ्या आर्थिक संकटात असल्याचे फेसबुक मित्रांना ती आॅनलाइनवरून सांगून आर्थिक मदतीची याचना करत असे. दुबई येथे काम करणाऱ्या जोविनो (आडनाव पोलिसांनी गुप्त ठेवले आहे) याला आपली खोटी कहाणी सांगून संशयित महिलेने फसविले होते आणि त्याच्याकडून ४.१५ लाख रुपये उकळले होते. हे पैसे त्याने तीन हप्त्यांत दिले होते. त्यानंतर लंडनमध्ये काम करणाऱ्या सेबी याच्याकडून ५० हजार रुपये उकळले होते. आणखीही पैसे मिळविण्यासाठी तिचे प्रयत्न चालू होते, असे पोलिसांच्या तपासावरून आढळून आले आहे. महत्त्वाचे म्हणजे या प्रकरणात आपली फसवणूक झाल्याची तक्रार कुणीही केली नव्हती. आपल्याला फसविले गेले असल्याची कुणाला जाणीव नसावी आणि त्यामुळे तक्रार केलेली नसावी, असा पोलिसांचा तर्क आहे. (प्रतिनिधी)
एनआरआयना महिलेचा आॅनलाईन गंडा
By admin | Published: March 10, 2015 1:34 AM