पणजी: न्यूड पार्टीचे आयोजन मोरजी- आश्वे येथे केले जाईल, अशा प्रकारची जाहिरात करणारी सदर व्यक्ती गोव्यातील नसून दिल्लीहून जाहिरात केली जात असल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले. तसेच पोलिसांनी या संबंधीत प्रकरणी एका व्यक्तीला हेरले असून आरोपीला लवकरच अटक केली जाईल असे देखील मुख्यमंत्र्यांनी आज(मंगळवारी) पत्रकारांशी बोलताना सांगितले.
10-15 विदेशी व 10 भारतीय महिला न्यूड पार्टीत सहभागी होतील अशा प्रकारची जाहिरात गेले काही दिवस केली जात आहे. सोशल मीडियावर त्याविषयी खूप चर्चाही होत आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. तसेच पोलिसांकडून देखील गेले दोन दिवस सखोल चौकशी करण्यात येत असून दिल्ली पोलिस यंत्रणोचीही मदत घेतली आहे. न्यूड पार्टीची जाहिरात दिल्लीहून येते हे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, पर्यटन खाते सांभाळणारे उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी अशा प्रकारची पार्टी गोव्यात होऊ देणार नसल्याचे पत्रकारांना सांगितले.
फोरमकडून निषेध
गोवा वूमन्स फोरमने न्यूड पार्टीच्या पोस्टरबाजीचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. एस्कॉर्ट सेवा वेबसाईटकडून जे दावे केले जात होते, ते आता सत्यात रुपांतरित होऊ लागल्यासारखे दिसते. गोवा सरकारने कठोर कारवाई करण्याची व गुन्हेगारांविरुद्ध गुन्हे नोंद करण्याची वेळ आली आहे, असे गोवा महिला फोरमच्या निमंत्रिक लॉर्ना फर्नाडीस यांनी म्हटले आहे. येत्या 27 रोजी जागतिक पर्यटन दिनी गोवा महिला फोरमकडून निषेधाचा कार्यक्रम आयोजित केला जाईल व सॅक्स टुरिझमविरुद्ध चळवळ व्यापक केली जाईल, असेही फर्नाडिस यांनी जाहीर केले आहे. येत्या महिन्यात होणाऱ्या ग्रामसभांमध्ये महिलांनी एस्कोर्ट सेवा वेबसाईट्सविरुद्ध ठराव संमत करून घ्यावेत अशीही मागणी फोरमने केली आहे.