पणजी : न्युड पार्टीवरुन महिला काँग्रेसने सरकारवर हल्लाबोल केला आहे. गोव्यात महिला, मुली सुरक्षित नसल्याचे महिला प्रदेश अध्यक्षा प्रतिमा कुतिन्हो यांनी म्हटले आहे.
पत्रकार परिषदेत कुतिन्हो म्हणाल्या की, मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि पर्यटनमंत्री बाबू आजगांवकर या प्रश्नावर वेगवेगळी विधाने करीत आहे. सुरवातीला तर न्युड पार्टीची जाहीरात खोटी असल्याचे सांगण्यापर्यंत मजल गेली. मात्र या विषयावर संतप्त जनमत पाहून नंतर चौकशी केली जात असल्याची भूमिका सरकारने घेतली. ड्रग्स, कॅसिनो, वेश्या व्यवसाय यामुळे गोव्याची आधीच बदनामी झालेली आहे. यात भर म्हणून आता न्युड पार्टीचे लोण आले आहे.’
कुतिन्हो पुढे म्हणाल्या की,‘मुख्यमंत्र्यांनी आधी स्वत:चे घर सुरळीत करण्याची गरज आहे. त्यांच्या मंत्रिमंडळात मटक्याचे गॉडफादर आहेत. पोलिस छोट्या मटकेवाल्यांना पकडतात मात्र या बड्या मटकेवाल्यांना पकडण्याची धमक दाखवत नाहीत.’ विद्यालयांपर्यंत ड्रग्स पोचले आहेत. पोलिस हप्ते घेऊन ड्रग्सवाल्यांना खुला मार्ग देतात, असा आरोप त्यांनी केला.
दरम्यान, भारतीय सिनेमांमध्ये बार डान्सरचे काम करणाºया पात्रांना गोव्यातील खिस्तींची मोनिका, रिटा आदी नावे देण्याचे जे प्रकार चालतात त्याचाही कुतिन्हो यांनी समाचार घेतला. अल्पसंख्यांकांची नावे देऊन त्यांची बदनामी करु नये. गोव्यातील ख्रिस्ती मुली उच्च शिक्षण घेऊन डॉक्टर, वकील तसेच अन्य पेशांमध्ये आहेत, असे कुतिन्हो म्हणाल्या.