मडगाव: सासष्टी तालुक्यातील दोन प्रमुख शहरे असलेल्या मडगाव आणि फातोर्डा येथे कोरोना रुग्णांच्या संख्येने कधीचाच हजारांचा पल्ला गाठलेला असतानाच जवळच्या राय गावात वाढलेली संख्याही चिंता वाढविणारी आहे.
31 सप्टेंबर पर्यंतच्या आकडेवारीप्रमाणे फातोर्डा येथे एकूण 1346 कोविड रुग्ण आढळून आले असून येथील सक्रीय रुग्णांची संख्या 340 आहे. मडगाव येथे 1093 रुग्ण आढळून आले असून त्यातील 363 सक्रीय आहेत. दोन्ही ठिकाणी प्रत्येकी 10 जणांना मृत्यू आला असून सासष्टीतील हे सर्वात जास्त प्रमाण आहे. मडगावात घोघोळ येथे शहरातील सर्वात जास्त म्हणजे 377 रुग्ण आढळून आले असून त्यातील 160 अजून सक्रीय आहेत. या एका ठिकाणीच 6 जणांना मृत्यू आला आहे.
याच पार्श्वभूमीवर जवळच्या राय गावात ऑगस्ट अखेरपर्यंत 86 रुग्ण आढळून आले होते. सप्टेंबर महिन्यात त्यात झपाट्याने वाढ होऊन 276 वर पोहोचले. राय येथे आतापर्यंत तिघांना कोविड मृत्यू आला आहे. त्यामानाने सुरवातीला जिथे उद्रेक झाला होता त्या कुंकळीत स्थिती काहीशी नियंत्रणात आली आहे. ऑगस्ट अखेर पर्यंत या भागात 111 सक्रीय रुग्ण होते सप्टेंबर अखेर हे प्रमाण 55 एव्हढे खाली उतरले आहे. कुंकळीत आतापर्यंत दोघांना कोविडमुळे मृत्यू आला आहे. या गावात आतापर्यंत 387 कोविड रुग्ण आढळून आले आहेत.
सासष्टीतील इतर गावामध्ये सध्या कुडतरी येथे 90, आके बायश येथे 89, रुमडामळ येथे 76, दवर्ली येथे 74 तर नावेली येथे 73 सक्रीय रुग्ण आहेत. आतापर्यत नावेली येथे 5 तर कुडतरी आणि रुमडामळ या भागात प्रत्येकी तिघांना मृत्यू आला आहे.
देवाच्या कृपेने वाचलो : चर्चिल
कोविडमधून बरे झालेले बाणावलीचे आमदार यांनी शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना देवाच्या कृपेनेच मी आणि माझी पत्नी फातिमा या जीवघेण्या आजारातून बरे झालो अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. त्या दोघांवर दोना पावला येथील मणिपाल इस्पितळात उपचार करण्यात आले होते. त्यांच्या पत्नींना प्लास्मा देण्यात आला होता.