वास्को : लॉकडाऊननंतर गोव्याच्या दाबोळी विमानतळावर येणाºया राष्ट्रीय प्रवासी विमानसेवेच्या संख्येत दिवसेंन दिवस चांगली वाढ होण्यास सुरवात झाली आहे. शनिवार (दि.३१) च्या आकड्यानुसार भारतीतील विविध भागातून ३७ प्रवासी विमाने गोव्यात उतरली असून यातून पाच हजाराहून जास्त प्रवासी गोव्यात दाखल झाले. दिवळी, नाताळ तसेच नवीन वर्षाच्या काळात दाबोळीवर येणाºया राष्ट्रीय प्रवासी विमानसेवेच्या संख्येत आणखीन वाढ होणार असून यामुळे गोव्याच्या पर्यटन व्यवसायाला फायदा होणार असल्याचा विश्वास दाबोळी विमानतळ संचालक गगन मलिक यांनी व्यक्त केला.
गोव्याच्या पर्यटक हंगामाला आॅक्टोंबरात सुरवात झाली तरी विदेशी पर्यटकांना घेऊन अजून एकही चार्टर विमान गोव्यात उतरले नसल्याने पर्यटक व्यवसायात असलेल्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. मात्र लोकडाऊनंतर दाबोळीवर हळू हळू राष्ट्रीय प्रवासी विमानांची संख्या वाढू लागल्याने काही प्रमाणात पर्यटक क्षेत्रातील व्यवसायिकदारांना यामुळे दिलासा मिळायला लागला आहे. दाबोळी विमानतळ संचालक गगन मलिक यांच्याशी चर्चा केली असता गेल्या १५ दिवसात बºयाच प्रमाणात दाबोळीवर राष्ट्रीय प्रवासी विमानांच्या संख्येत वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले. आॅक्टोंबर महीन्यात मंगळवारच्या दिवशी सर्वात कमी अशी दिवसाला १४ विमाने प्रवाशांना घेऊन उतरायची, आता यात चांगली वाढ झाल्याचे मलिक यांनी सांगितले. आता दाबोळी विमानतळावर दिवसाला सुमारे ३७ राष्ट्रीय प्रवासी विमाने हाताळण्यात येत असून यातून सुमारे पाच हजार प्रवासी गोव्यात येतात. दिवाळी, नाताळ तसेच नवीन वर्षाच्या काळात दाबोळी विमानतळावर राष्ट्रीय प्रवासी विमानांच्या संख्येत आणखीन वाढ होणार आहे.
अहमदाबाद व मुंबई विमानतळानंतर भारतातील ‘वेर्स्टन रिजन’ मधील दाबोळी विमानतळ सद्या सर्वात जास्त राष्ट्रीय विमाने व प्रवासी हाताळण्यासाठी दुसºया क्रमांकावर असल्याची माहीती गगन मलिक यांनी पुढे दिली. भविष्यात दाबोळीवर राष्ट्रीय विमानांची संख्या आणखीन वाढणार असून यामुळे गोव्याच्या पर्यटन व्यवसायालाही चांगला फायदा होणार असा विश्वास मलिक यांनी व्यक्त केला.