पणजी : गोव्यात विदेशातून पर्यटकांना घेऊन येणाऱ्या चार्टर विमानांची संख्या यंदाच्या पर्यटन मोसमात 20 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. सरकारच्या पर्यटन खात्याला आणि गोवा ट्रॅव्हल अॅण्ड टुरिझम असोसिएशन (टीटीएजी) या संघटनेलाही अशीच शक्यता वाटते.गोव्याचा नवा पर्यटन मोसम सुरू झाला आहे. आतापर्यंत दोन चार्टर विमाने गोव्यात दाखल झाली आहेत. या ऑक्टोबर महिन्यात 30 चार्टर विमाने हजारो विदेशी पर्यटकांना घेऊन गोव्यात येणार असल्याची नोंद झाली आहे. गोव्याचा दाबोळी विमानतळ हा नौदलाच्या ताब्यात येतो. नौदलाच्या कवायतींमुळे चार्टर विमाने उतरण्याविषयी दाबोळी विमानतळावर थोडे निर्बंध आले होते व यामुळे चार्टर विमानांची संख्या घटेल अशी शक्यता निर्माण झाली होती. मात्र मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी या विषयात हस्तक्षेप केला व नौदल अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन तोडगा काढला. यामुळे चार्टर विमाने उतरण्याचा व पार्क करून ठेवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जास्त पैसे गोव्यात खर्च करू शकतील असे विदेशी पर्यटक चार्टर विमानाने येत असतात.
गेल्या पर्यटन मोसमात मे महिन्यापर्यंत गोव्यात एक हजारपेक्षा जास्त चार्टर विमाने आली होती. रशियामधून सुमारे सहाशे विमाने आली होती. युक्रेनमधून शंभरहून जास्त चार्टर विमाने आली होती. यंदाही रशियामधून गोव्यात येणाऱ्या चार्टर विमानांची संख्या वाढणार आहे. दरम्यान, गोवा टूर अॅण्ड ट्रॅव्हल संघटनेचे अध्यक्ष सावियो मेसियास यांनी दाबोळी विमानतळावर विमाने उतरविण्याबाबतचे निर्बंध नौदलाने थोडे शिथिल केल्याबाबत समाधान व्यक्त केले आणि आता चार्टर विमानांची संख्या गोव्यात वाढेल, असा विश्वास व्यक्त केला.