नारायण गवस
पणजी : गेले २१ दिवस येथील आझाद मैदानावर आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी धरणे आंदोलन करीत असलेल्या कदंब परिवहन महामंडळ चालक व सहयोगी कर्मचारी संघटनेची सरकारने दखल घेतली नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी शुक्रवार, १५ मार्च रोजी सकाळी १० वाजता आझाद मैदानावर कुटुंबियांसोबत महामेळावा आयोजित केला आहे. यात राज्यभरातील विविध कामगार संघटनेचे नेते व कर्मचारी उपस्थित असणार असल्याची माहिती कदंब परिवहन महामंडळ चालक व सहयोगी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत चोडणकर यांनी दिली.
तात्काळ २५० नवीन बसेस आणून राज्यांतर्गत सगळ्या गावोगावी बस गाड्या चालू ठेवा. भविष्यनिर्वाह निधीची पुनःस्थापन करा. सातवा वेतन आयोग करार अंतिम करा. सातव्या वेतन आयोगाची थकबाकी ताबडतोब द्या. समान काम समान पगाराच्या आधारावर बदली कामगारांना कायम करा. इलेक्ट्रिक बसेस कदंब व्यवस्थापनाने चालवल्या पाहिजेत आणि त्यांची देखभाल दुरूस्ती कदंब कर्मचाऱ्यांनी करावी. या प्रमुख मागण्यांसाठी हे कर्मचारी आझाद मैदानावर आंदोलन करत आहेत. पण सरकारकडून काहीच प्रतिसाद नसल्याने आता हे आंदोलन तीव्र केले जाणार असेही चंद्रकांत चोडणकर यांनी सांगितले.
कदंब परिवहन महामंडळ चालक व सहयोगी कर्मचारी संघाच्यावतीने ७ फेब्रुवारीपासून धरणे आंदोलन सुरू केले आहे. आज २१ दिवस झाले आहेत. हे कर्मचारी रोज सकाळी ९.३० ते दुपारी १ पर्यंत आंदोलन करत आहेत. आंदोलनाकडे महामंडळ, सरकारने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी महामेळावा आयोजित केला आहे. राज्यातील ४५ संघटनांचा पाठिंबा दिला आहे.