लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : विधानसभेचे पावसाळी अधिवेशन तोंडावर असताना ओडीपींच्या विषयावरुन सरकारमधील दोन मंत्र्यांमध्ये भडका उडाला. परंतु सकाळी झालेल्या या वादावर सायंकाळी पडदा पडला.
महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी नगरनियोजन खाते ओडीपींच्या बाबतीत आमदार किंवा मंत्र्यांना विश्वासात घेत नाही. तसेच पीडीएच्या बैठकाच होत नाहीत. पीडीए वाऱ्यावर सोडल्यासारखाच प्रकार असल्याचा आरोप करुन नगर नियोजनमंत्री विश्वजीत राणे यांच्यावर काल सकाळी निशाणा साधला. म्हापशात दोन दिवसांपूर्वी झालेल्या भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीतही बाबूश या प्रश्नावरुन आक्रमक बनले होते- भाजपच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीवेळी काल सकाळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी नगर नियोजना खात्याच्या कारभारावर टीका केली. परंतु सायंकाळी मात्र हा वाद मिटल्याचे दिसून आले.
पणजीचा ओडीपी चार वर्षे झाली तरी पूर्ण होऊ शकलेला नाही. फाइल्स येतात तेव्हा आम्हीही गोंधळात पडतो ओडीपींच्या बाबतीत पारदर्शकता हवी असे बाबूश म्हणाले. एकदा ओडीपी तयार केला की दहा वर्षे त्याला हाता लावता येत नाही. ताळगावचा ओडीपी २०१९ मध्ये तयार केला. या ओडीपीमध्ये २०२९ पर्यंत कोणतेही बदल करु नयेत, असे ते म्हणाले.
मतभेद नाहीत...
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना विचारले असता मंत्रिमंडळातील कोणाही मंत्र्यांमध्ये मतभेद नाहीत. आम्ही सर्व एक परिवार आहोत, असे त्यांनी सांगितले.
नावे उघड करीन
राणे म्हणाले की, काँग्रेस हा विरोधी पक्ष आहे, त्यामुळे त्यांनी टीक करणे त्यांचे कामच आहे. परंतु एक मात्र निक्षून सांगतो की, काँग्रेसच्या अनेक नेत्यांनीही माझ्या खात्याकडून त्यांच्या वेगवेगळ्या कामांसाठी मदत घेतलीय. या सर्वांची नावे विधानसभेत उघड करीन.
आम्ही एकाच भाजप कुटुंबातले
मंत्री विश्वजित राणे यांना विचारले असता ते म्हणाले की, ओडीपींबाबत काही मुद्दे होते त्यावर चर्चेने तोडगा काढला. आमच्यात कोणतीही कटूता राहिलेली नाही. आम्ही दोघेही एकाच भाजप कुटुंबातले आहोत.
आमच्यात कटुता नाही
सायंकाळी पत्रकारांनी बाबूश यांना पुन्हा विचारले असता 'विश्वजीत हे माझे मंत्रिमंडळातील सहकारी आहेत. आम्ही एकाच परिवारातील आहोत. मी किंवा ते दोघेही राजकारणात येण्याआधीपासून आमचे संबंध आहेत. ओडीपींच्या याबाबतीत त्यांच्याशी बोललो व काही गोष्टींमध्ये पारदर्शकता असायला हवी, एवढेच सांगितले. आमच्यामध्ये कोणतीही कटूता राहिलेली नाही.