पणजी - दक्षिण गोव्यातील वाहतुकीचा महत्त्वाचा दुवा मानला जाणारा राष्ट्रीय महामार्ग १७ वरील झुवारी पूल कमकुवत आणि धोकादायक बनला असल्याची माहिती आरटीआय अर्जाला मिळालेल्या उत्तरातून प्राप्त झाली असल्याचा दावा करीत काँग्रेसने सरकारला जनतेच्या जीवाशी खेळू नका, असा इशारा दिला आहे. या नदीवरील नव्या पुलाच्या बांधकाम निविदेतही काळेबेरे असून एकूण प्रक्रियेची चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे.
पक्षाचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर पत्रकार परिषदेत म्हणाले की, ‘ जुन्या पुलाचे लोड टेस्टिंग केलेले नाही. पुलाच्या स्ट्रक्चरल स्थितीबाबत तसेच पुलासाठी वापरलेले पोलाद गंजले आहे का याचीही तपासणी झालेली नाही. सरकारने लोकांच्या जीवाशी खेळ मांडला आहे.’ ते पुढे म्हणाले की, ‘ गेल्या १९ जुलै रोजी केवळ अधिसूचना काढून सरकार गप्प बसले. या पुलावरुन किती भार वाहून नेला जाऊ शकतो किंवा काय याबाबत कोणतीही जागृती केलेली नाही. १२ टनांपेक्षा जास्त वजनाच्या वाहनांना या पुलावरुन वाहतूक करण्यास मनाई आहे. केवळ प्रवासी वाहतूक करणाºया नियमित बसगाड्यांना १६.५ टन भार वाहण्याची मुभा आहे. हे निर्बंध घातलेले असले तरी अंमलबजावणी मात्र केली जात नाही. तपासणी करण्यासाठी कोणतीही यंत्रणा कार्यरत नाही. पुलाच्या उभय बाजूंना फलकही लावलेले नाहीत.’
आरटीआय अर्जाच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार बांधकाम खात्याचा गेल्या २0 एप्रिलचा अहवालही असे सांगतो की, जुन्या पुलाच्या पीएल ३ आणि पीएल ४ या कमानींमधील सांधे कमकुवत झालेले आहेत. ८ मे २0१८ रोजी प्रधान मुख्य अभियंत्यांनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाला पत्र लिहून तसे कळविले आहे. १९८३ साली बांधलेल्या या पुलाची कंपनेही वाढलेली आहेत. असे असताना या पुलवरुन अवजड वाहने जाऊ देणे ही बेपर्वाईच आहे. उद्या एखाद अपघात घडून आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास ती हाताळण्याची सज्जता आहे का , असा सवाल त्यांनी केला.
नव्या पुलाच्या निविदा प्रक्रियेत काळेबेरे असून कंत्राट लाटण्यासाठी वशिलेबाजी झालेली आहे तसेच दलालीचाही प्रकार घडलेला आहे, असा संशय व्यक्त करुन या प्रकरणात सखोल चौकशीची मागणी चोडणकर यांनी केली.