फोंडा : केरी - फोंडा येथे रविवारी पहाटे तीन वाजता झालेल्या एका अपघातातपोलिस कॉन्स्टेबल जागीच ठार झाला. रचत रामचंद्र सतरकर (२१) असे त्याचे नाव आहे. दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने ती विजेच्या खांबाला धडकून हा अपघात झाला. रचत याच्या नोकरीच्या पहिल्याच दिवशी हा अपघात झाला.
पोलिसांनी सांगितले की, तळेवाडा अडकोण - बाणस्तारी येथील रचत रामचंद्र सतरकर (वय २१) हा युवक मडगाव येथून केरी येथे आपली स्कूटर (जीए ०५ एन ९६४३) ने जात होता. पहाटे तीन वाजता आपटेश्वर नगर सातोडे - केरी येथील वीज खांबाला त्याची धडक बसली. अपघातात त्याच्या डोक्याला जबर मार लागला. या अपघाताची माहिती समजताच घटनास्थळी १०८ रुग्णवाहिका दाखल झाली. रुग्णवाहिकेतील कर्मचाऱ्यांनी तपासणी करून तो मृत झाल्याचे घोषित केले.
अपघातात दुचाकीच्या पुढच्या भागाचा चक्काचूर झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक रश्मी भाईडकर यांनी घटनास्थळी भेट दिली. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मडगाव जिल्हा इस्पितळ येथे पाठवण्यात आला.
नोकरीच्या पहिल्याच दिवशी...
अपघातात मृत्यमुखी पडलेला रचत हा कालच नोकरीवर रुजू झाला होता. आठ दिवसांपूर्वी वाळपई येथील पोलिस प्रशिक्षण सेंटरमध्ये प्रशिक्षणानंतर त्याचा दीक्षान्त समारंभ झाला होता. कान्तो रीतसर नोकरीवर रुजू झाला. मिळालेल्या माहितीप्रमाणे मडगाव येथे व्हॉलिबॉल स्पर्धेत भाग घेऊन तो परतत होता. रचत खूप वेळा तो केरी येथे आपल्या मावशीकडे राहायचा. काल तो मडगाव येथून थेट आपल्या मावशीच्या घरी जायला निघाला होता. आणि हा अपघात झाला. रचतच्या पश्चात आई, वडील, लहान भाऊ व बहीण असा परिवार आहे.