फोडा- बेतोडा-फोडा येथील ओहोळात औद्योगिक रसायन सोडण्याचा प्रकार पुन्हा एकदा उघडकीस आला असून, ऐन पावसाळ्यात स्वच्छ वाहणाऱ्या पाण्यात घातक रसायन सोडल्याने मासे गतप्राण होण्याची घटना घडली आहे. सदर रसायनामुळे ओहोळातील जैव संपदा धोक्यात आली आहे. जलस्त्रोत खात्याने संबंधावर कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
मागची अनेक वर्षे सातत्याने सदर प्रकार होत आहे. गेल्या वर्षी तक्रारही दाखल करण्यात आली होती, पण त्याची दखल घेतली नसल्याने आता आंदोलन केल्याशिवाय पर्याय नाही, असा इशारा पर्यावरण प्रेमींनी दिला आहे.
बेतोडा येथून वाहणारा हा नाला एकेकाळी संपूर्ण परिसराची तहान भागवण्याचे काम करायचा .परंतु औद्योगिक वसाहत स्थापन झाल्यानंतर सदर ओहोळावर एका बाजूने अतिक्रमणे वाढली व दुसऱ्या बाजूला औद्योगिक कारखान्यातील रसायनिक व प्रक्रिया केलेले पाणी थेट ओहळात सोडण्याचे प्रकारही वाढीस लागले आहे. मागच्या वर्षी सुद्धा असेच मध्यरात्री पाणी सोडल्यानंतर सकाळी संपूर्ण ओहोळातील मासे व अन्य जीव गतप्राण होऊन पाण्यावर तरंगताना चे दृश्य लोकांच्या नजरेस पडले होते. त्यावेळी पर्यावरण प्रेमींनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करण्याचे नाटक केले होते. परंतु नंतर त्या पाहणीचे काय झाले हे कोडे गुलदस्त्यातच आहे. कारण त्याचवेळी जर या संदर्भात शहानिशा करून संबंधितावर कारवाई झाली असटी तर आज पुन्हा एकदा सदर ओहळात पाणी सोडण्याचे धाडस समाजकंटकांना झाले नसते.
कृषिमंत्री रवी नाईक यांनी सुद्धा मागच्या वर्षी घडलेले प्रकरण गांभीर्याने घेतले होते व त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना या संबंधी चौकशी करण्याचे आदेश दिले होते . निदान आता तरी स्थानिक आमदार रवी नाईक यांनी ह्या प्रकरणचया मुळाशी जाऊन संबंधितावर कारवाई करण्यासाठी ठोस उपाययोजना करावी अशी मागणी पर्यावरण प्रेमी करत आहेत.
या नाल्यात घातक रसायन सोडण्याच्या प्रकारामुळे अनेकदा त्यातील लहान मासे मृत होत असल्याचे आढळून आले आहे. सदर प्रकारामुळे नदीतील प्रदूषण एका बाजूने वाढत आहे तर दुसऱ्या बाजूने एकूणच जैवसंपदेवर घाला घातला जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. या नाल्यात जलचरांबरोबरच जैववनस्पतीही मोठया प्रमाणात आहेत. घातक रसायनांचा प्रादुर्भाव या वनस्पतीवरही होत असल्याचे पर्यावरणप्रेमींनी म्हणत आहेत.
बेतोडा येथील नाल्यात संध्याकाळच्या वेळी किंवा मध्यरात्री नंतर रसायन सोडले जाते असावे. फेसळयुक्त घातक पाण्यात मासे मोठया प्रमाणात पाण्यात तरंगताना दिसत असून हेच पाणी पुढे महत्त्वाच्या कपिलेश्वरी नाल्यात मिसळत असल्याने जैवसंपदा धोक्यात आली आहे. गेल्या वर्षी यासंबंधी तक्रार केली होती, पण कोणतीच कारवाई झाली नाही.
बोंडबाग, बेतोडा ते कुटी फोंडा, खडपाबांध तसेच कवळे व गावणेपर्यंत हा नाला जातो. मंगळवारी संध्याकाळी हे रसायन सोडल्याचे स्पष्ट झाल्यानंतर फोंड्यातील नागरिकांनी बेतोडा नाल्याला भेट देऊन निषेध केला.
आरोग्य खाते, प्रदूषण नियंत्रण मंडळ याने निदान आता तरी हा विषय गांभीर्य पूर्वक घ्यावा अशी मागणी लोक करत आहेत. विशेष म्हणजे झोपडपट्टी भागातील लहान मुले या पाण्यात डुंबत असतात. भागातील मजूर लोकांच्या बायका कपडे धुण्यासाठी नागझरी येथे या नाल्यावर येत असल्याने या प्रदूषित पाण्यापासून त्यांच्या जीवालाही धोकाही निर्माण होत आहे.
सदर नाला फक्त पावसाळ्याच्या दिवसात प्रदूषण विरहित असतो. एरवी प्लास्टिक पिशव्या व अन्य घातक वस्तूंचा मारा इथे असतो. त्यात परत औद्योगिक वसाहतीतील सांडपाणी ह्या नाल्यात खूप ठिकाणी सोडले जात आहे. त्यामुळे ह्या पाण्यात हात घालणं सुद्धा धोकादायक होत आहे. सरकारी यंत्रणेला सर्वकाही माहित आहे परंतु जाणून बूजून या सगळ्या गोष्टीकडे ते कानाडोळा करत आहेत. मागच्या वर्षी जर ठोस उपाय योजना झाली असती तर आज पुन्हा एकदा जलचर गतप्राण झाले नसते.
संदीप पारकर