ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. 15 - गोव्यात धार्मिक स्थळं व प्रतिकांची मोडतोड केल्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. फ्रान्सिस परेरा (वय 50 वर्ष) असं अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव असून तो टॅक्सी ड्रायव्हर आहे. आरोपीनं केलेल्या गुन्ह्याची कबुलीही दिली आहे. अधिक पुराव्यांसाठी पोलिसांनी त्याच्या घराचीही तपासणी केली. धक्कादायक बाब म्हणजे परेरावर हत्येच्या प्रयत्नाचाही गुन्हा दाखल आहे.
काही दिवसांपासून गोव्यामध्ये विशेषतः दक्षिण गोव्यात धार्मिक प्रतिकाच्या मोडतोडीचे प्रकार सुरू होते. पोलीस बंदोबस्त वाढवूनदेखील धार्मिक प्रतिकाच्या मोडतोडीचे प्रकार थांबलेले नव्हते. अखेर पोलिसांनी तपासातील गती वाढवून आरोपीला गजाआड केले आहे.
याप्रकरणी काँग्रेसने पोलिसांना अपयश येत असल्याने धार्मिक प्रतिमांच्या मोडतोडीचा तपास सीबीआयकडे सोपवावा अशी मागणी केली होती. तर गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष, मंत्री विजय सरदेसाई यांनी तर या घटनेस जबाबदार असलेल्यांना दहशतवाद्यांसारखी वागणूक देत दिसताक्षणी गोळ्या झाडायला हव्यात, असे मत व्यक्त केले होते. तर धार्मिक संस्था व राज्यपालांनी धार्मिक सलोखा जपण्याचे आवाहन केले होते.
दरम्यान, या प्रकरणी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी उच्च स्तरीय बैठक बोलावली आहे.