पूजा नाईक प्रभूगावकर, पणजी: अमलीपदार्थ बाळगल्याप्रकरणी अमलीपदार्थ विरोधी पथकाने माेरजी येथे केलेल्या कारवाईत किशोर चव्हाण (२७,धारवाड-कर्नाटक ) याला अटक केली. त्याच्याकडून गांजा व रोख रक्कम मिळून ३.१५ लाखांचे साहित्य जप्त करण्यात आले.
चव्हाण याच्याकडे कारवाईवेळी ३.०७२ किलो गांजा व २ हजार ७० रुपये रोख रक्कम आढळून आली. यात ५०० रुपयांच्या चार नोटा, ५० रुपयांची एक तर १० रुपयांच्या दोन नोटींचा समावेश आहे. संशयिता विरोधात पथकाने अमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा नाेंद केला आहे.
अमलीपदार्थ विरोधी पथकाचे उपनिरीक्षक गिरीश पाडलोसकर यांच्या पथकाने सदर कारवाई ठोस माहितीच्या आधारे २ जानेवारी रोजी रात्री ११ ते ३ राेजी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास माेरजी खिंड पार्कच्या गेट समोर केली. चव्हाण हा मुळ कर्नाटक येथील असला तरी तो सध्या मोरजी येथील एका गेस्ट हाऊस मध्ये रहात होता. कारवाईवेळी त्याच्याकडे गांजा आढळून आला. हा गांजा त्यांनी निळ्या रंगाच्या पॉलिथीन पिशवीत लपवला होता.