लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : कांदोळी येथील एका क्लबमध्ये लावलेल्या मोठ्या संगीताच्या आवाजामुळे या परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीचा हृदयविकाराने मृत्यू झाला. स्थानिकांनी शुक्रवारी (दि.२९) ही घटना घडल्याचे सांगितले. या प्रकाराबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
उपलब्ध माहितीनुसार २९ डिसेंबर रोजी कांदोळी येथील एका क्लबमध्ये पार्टीचे आयोजन केले होते. खरेतर नियमांनुसार रात्री १० वाजल्यानंतर मोठ्या आवाजात संगीत लावले जाऊ शकत नाही. मात्र, क्लबने सर्व नियम धाब्यावर बसवून संगीत लावणे सुरूच ठेवले. त्यामुळे या परिसरात राहणाऱ्यांना लोकांची झोपमोड तर झालीच. शिवाय अनेकांना आरोग्याची समस्या उद्भवली.
रात्री उशिरापर्यंत हा कार्यक्रम सुरू होता. मोठ्याने लावलेल्या संगीतामुळे एका व्यक्तीचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला. याविषयी संबंधित सरकारी यंत्रणांकडे तक्रार करूनही त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला. ज्या क्लबच्या परिसरात हा प्रकार घडला, तेथे आगामी काळात आणखी अशाच प्रकारचे कार्यक्रम होतील, अशी जाहिरातबाजी केली जात आहे. त्यामुळे आरोग्याला धोका उद्भवत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
दरम्यान, भविष्यात अशा प्रकारच्या पाट्यामध्ये मोठ्या आवाजात संगीत लावण्यावर असलेले वेळेचे बंधन कठोरपणे पाळावे. नियमांचे उल्लंघन होऊ नये यासाठी यंत्रणांनी सतर्क राहावे, या घटनेस जे कोणी जबाबदार आहेत, त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी लोक करीत आहेत.
मृत्यू आवाजामुळे नव्हे : कुटुंबाचा दावा
कांदोळी येथील क्लबमध्ये कर्णकर्कश संगीत लावल्याने आपल्या वडिलांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालेला नाही असे संबंधित व्यक्त्तीच्या मुलीने स्पष्ट केले. रिव्होल्यूशनरी गोवन्स पक्षाच्या एका कार्यकत्यनि स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठी क्लबमध्ये कर्णकर्कश संगीत लावल्याने मृत्यू झाल्याची अफवा पसरवली, असे या मुलीने नमूद केले आहे.