वास्को: साईनगर - फकीरगल्ली, मांगोरहील येथील एका खोलीत घरगुती गॅस सिलिंण्डर मधून गॅस गळती होऊन २१ वर्षीय संजय बिंद नामक तरुण गुदमरून मरण पावला. त्याच खोलीतील अन्य तिघे तरूण गळती मुळे बेशुद्ध होऊन त्याची प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर बांबोळीतील गोमॅको इस्पितळात उपचार आहे. तीन दिवसापूर्वी उत्तरप्रदेश येथील आठ तरुण गोव्यात आल्यानंतर त्यांनी मांगोरहील येथे दोन खोल्या घेऊन चार - चार जण करून ते एका खोलीत राहत असून त्यापैंकीच एका खोलीत गॅस गळती होऊन तो तरुण मरण पावला.
वास्को पोलीसांनी दिलेल्या माहीतीनुसार रविवारी (दि.१२) सकाळी ८.३० वाजता ती घटना उघडकीस आली. शुक्रवारी वाराणासी, उत्तरप्रदेश येथील आठ तरुण कामाच्या निमित्ताने गोव्यात आले असून त्यांनी मांगोरहील येथे दोन खोल्या भाड्याने घेतल्या. त्या दोन्ही खोलीत चार चार तरुण राहत होते. रविवारी सकाळी एका खोलीतील तरुणांनी दुसऱ्या खोलीत झोपलेल्या तरुणांना उठवण्यासठी खोलीचा दरवाजा ठोठावण्यास सुरवात केली.
बराच वेळ दरवाजा ठोठावून सुद्धा त्या खोलीतील तरुण दरवाजा उघडत नसल्याने काहीतरी घडल्याची जाणीव दुसऱ्या खोलीतील तरुणांना झाल्यानंतर त्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. दरवाजा तोडून आत प्रवेश केला तेव्हा त्या खोलीतील चारही तरुण बेशुद्ध अवस्थेत पडल्याचे त्यांना आढळून आले. तसेच खोलीत बऱ्याच अधिक प्रमाणात गॅस गळतीचा वास येत असल्याचे त्यांना आढळून आले. चार तरुण खोलीत बेशुद्ध पडल्याचे आढळून येताच त्वरित १०८ रुग्ण वाहीकेला बोलवून त्यांना उपचारासाठी चिखली उपजिल्हा इस्पितळात नेण्यात आले.
चारही तरुणांना इस्पितळात नेले असता त्यापैंकी संजय बिंद (वय २१) याचा इस्पितळात आणण्यापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. बेशुद्ध अवस्थेतील त्या तीन तरुणापैंकी एकाच्या तोंडातून रक्त येत असून तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याने नंतर त्यांना पुढच्या उपचारासाठी बांबोळीच्या गोमॅको इस्पितळात पाठवण्यात आले. त्या तीन तरुणांपैकी एकाची प्रकृती चिंताजनक असून अन्य दोघांची प्रकृती सुधारल्याची माहीती रविवारी दुपारी पोलीसांकडून मिळाली.
वास्को पोलीसांना घटनेची माहीती मिळताच त्यांनी त्वरित घटनास्थळावर दाखल होऊन पंचनामा केला. शनिवारी रात्री त्या खोलीतील तरुणांनी जेवण बनवण्यासाठी गॅस चालू केल्यानंतर तो बंद करण्यास ते विसरले असावे असे पोलीसांना प्रथम तपासणीत जाणवत आहे. खोलीच्या सर्व खिडक्या आणि दरवाजा पूर्णपणे बंद असल्याने रात्रभर गॅस गळती होऊन ते तरुण त्यात गुदमरून त्यापैंकी एकाचा मृत्यू झाला असावा अन् तिघेजण बेशुद्ध झाले असावे असे सद्याच्या तपासात जाणवत असल्याची माहीती पोलीस सूत्रांनी दिली. वास्को अग्निशामक दलाला घटनेची माहीती मिळताच दलाच्या जवानांनी त्वरित घटनास्थळावर पोचून सुरक्षेच्या दृष्टीने पुढची उचित पावले उचलली. वास्को पोलीस स्थानकाचे निरीक्षक कपील नायक यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास चालू आहे.