अजय बुवा, लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा: येथे रविवारी रात्री उशिरा व सोमवारी भल्या पहाटे झालेल्या दोन अपघातात एक युवक ठार झाला आहे. तर दोन व्यक्ती जखमी होण्याची घटना घडली आहे. रविवारी रात्री उशिरा झालेल्या एका अपघातात आशिष अरुण पाटील हा तरुण मृत्यूमुखी पडला आहे. सविस्तर वृत्तानुसार आशिष पाटील आपले कामकाज आटपून ,आपली दुचाकी क्रमांक जी ए- ०५ -वी -५१८६ वरून -रात्री घरी परत जात असताना,रात्री दहा वजता बोरी येथे बगल रस्त्यावर पार्क करून ठेवलेल्या हिताची ह्या अवघड वाहनाला त्याची मागून धडक बसली. सदर अपघातात त्याच्या डोक्याला जबर मार बसल्याने तो जागीच मरण पावला.
लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे सदर अपघात झाला आहे. मागचे काही महिने बगल रस्त्याचे काम चालू आहे. कर्नाटकला जोडणारा हा महत्वाचा राष्ट्रीय महामार्ग असल्याने येथे मोठ्या प्रमाणावर रात्री अपरात्री वाहनांची वर्दळ चालू असते. तशातच परत ह्या रस्त्यावर विजेच्या खांबांची सोय नाही. परिणामी संपूर्ण परिसरात काळोख पसरलेला असतो. ज्यावेळी एखादे वाहन जात असते, त्यावेळी समोरून येणाऱ्या वाहनाचा प्रखर प्रकाशाचा अंदाज न आल्याने अपघात घडत आहेत .रविवारी घडलेला सदर अपघात सुद्धा अशाच प्रकारातून घडण्याची शक्यता आहे. काम झाल्यानंतर कंत्राटदाराने सदरचे वाहन हे बाजूला ठेवायला हवे होते. रस्त्यावर ठेवणे बरोबर नव्हते. आशिष पाटील हा मूळ खानापूर (कर्नाटक) येथील असून सध्या तो केजीएन नगर मध्ये राहत होता.
दुसऱ्या एका अपघातात आर्टिगा कार व पिकआप यांच्या दरम्यान झालेल्या अपघातात कारमधील दोघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांना अधिक उपचारासाठी गोवा मेडिकल कॉलेजमध्ये पाठविण्यात आले आहे. सविस्तर वृत्तानुसार सरस्वती मंदिर परिसरात पहाटे चार वाजता अर्टिगा क्रमांक जीए- ०८- एम- ७१५० व पिकअप क्रमांक केए- ०६- एबी- 23 57 यांची समोरासमोर टक्कर झाली. सदर अपघातात यश पालेकर (वय 18 राहणार फोंडा) व सिद्धि नाईक ( 19 राहणार कुडचडे) हे गंभीर जखमी झाले असून गो मे को मध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. फोंडा पोलिसांनी दोन्ही अपघाताचा पंचनामा केला असून पुढील तपास सुरू केला आहे.