धारबांदोडा येथे सकाळी साडेदहाच्या दरम्यान दोन दुचाकी मध्ये झालेल्या अपघातात एक दुचाकी स्वार ठार झाला आहे तर, दुसरा जखमी झालेला आहे. सविस्तर वृत्तानुसार दावकोण धारबांदोडा येथील गोकुळदास गावकर हे धारबांदोडा बाजारातून आपल्या घरी परत जात होते. राष्ट्रीय महामार्गावरून त्यानी दावकोण दिशेने जाणाऱ्या आपल्या अंतर्गत रस्त्यावर गाडी वळवली असता समोरून भरधाव वेगात येणाऱ्या मोटरसायकलची त्यांना धडक बसली.
सदरची धडक एवढी भयानक होती की गोकुळदास गावकर यांच्या दुचाकीची संपूर्ण मोडतोड झाली होती. रस्त्यावर फक्त दुचाकीचा सांगाडाच आढळून आला. सदर अपघातात गोकुळदास गावकर हे बेशुद्ध होऊन रस्त्यावर पडले होते. पोलिसांनी ॲम्बुलन्स बोलवून जखमी झालेल्या गोकुळदास गावकर व दुसरा दुचाकीस्वार शेख अब्दुल सलीम (राहणार मडगाव) याला अगोदर पिळये येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. गोकुळदास गावकर यांना त्वरित अधिक उपचार पाहिजे असे आढळून येताच त्यांना तातडीने पणजी येथील गोवा मेडिकल कॉलेजमध्ये हलण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु अंबुलन्स वाटेतच असताना त्यांनी प्राण सोडले. सदर अपघातास कारणीभूत ठरलेला शेख अब्दुल सलीम याच्या खांद्याचे हाड मोडले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. रेशन घेऊन जात होते मिळालेल्या माहितीनुसार गोकुळदास गावकर हे धारबांदोडा येथे सकाळी रेशनिंगचे तांदूळ घेण्यासाठी आले होते. तांदूळ घेऊन ते परत आपल्या घराकडे जात असताना भरधाव वेगात येणाऱ्या दुचाकीने त्यांचा जीव घेतला. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच संपूर्ण दावकोण गावावर शोककळा पसरली आहे.