केपे (ख्रिस्तानंद पेडणेकर) : गेल्या काही दिवसांपासून मोरपिर्ला-केपे परिसरात दोन बिबट्यांनी अक्षरश: दहशत माजवली आहे. मात्र, यातील एक बिबट्या वन विभागाने रचलेल्या सापळ्यात अडकल्यामुळे लोकांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी दुसरा बिबट्या मोकाटच असल्यामुळे भिती मात्र कायम आहे.
केपे तालुक्यातील मोरपिर्ला भागात बिबट्यांचा संचार वाढला आहे. रात्रीच्यावेळी ये-जा करणाऱ्या लोकांवर बिबट्याने हल्ला केल्याच्या घटनाही घडल्या आहेत. अनेकांच्या पाळीव जनावरांवर हल्ला करून त्यांचा फडशा पाडल्यामुळे या परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. याबाबत वन विभागाकडे तक्रार केल्यानंतर अधिकाऱ्यांनी त्याची दखल घेऊन जागो जागी सापळे लावले होते.
अनेक दिवसांपासून बिबट्या वन विभागाच्या सापळ्यांना चकवा देत होता. मात्र, काल पहाटेच्या सुमारास एक बिबट्या सापळ्यात अडकला. यापूर्वी सांगे तालुक्यातील काही गावांत बिबट्याने दहशत माजवली होती. आठ दिवसांपूर्वीच वन खात्याने सापळा रचून त्या बिबट्याला जेरबंद केला होते.
मोरापिर्ला ग्रामस्थांनी दुसऱ्या बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळे वाढवावेत, अशी मागणी केली आहे. आमदार एल्टन डिकॉस्टा यांनीही याची दखल घेऊन वन विभागाला सतर्कतेच्या तसेच उपाय योजना करण्याच्या सूचना दिल्याची माहिती, पंच सदस्य प्रकाश वेळीप यांनी दिली.