पंकज शेट्ये, लोकमत न्यूज नेटवर्क, वास्को: बुधवारी (दि.१०) वास्कोतील आयओसी जंक्शन जवळ १२ चाकी टँकर आणि मोटरसायकल यांच्यात झालेल्या अपघातात हसन राजेसाब हजरथ्थी नामक इसम गंभीररित्या जखमी झाला असून त्याच्यावर इस्पितळात उपचार चालू आहे. हसन बायणा भागातून वास्कोला येताना जंक्शनजवळ पोचला असता तेथे वळण घेत असलेल्या टँकरची त्याच्या दुचाकीला धडक बसून तो खाली पडला असता, टँकरचे एक चाक त्याच्या पायावर चढून तो गंभीररित्या जखमी झाला.
वास्को पोलीसांनी दिलेल्या माहीतीनुसार बुधवारी सकाळी ९.४५ वाजता तो अपघात घडला. बायणा येथे राहणारा ५५ वर्षीय हसन हजरथ्थी मोटरसायकल (जीए०६ जे ७४३४) वरून वास्कोला येत होता. जेव्हा तो जंक्शन जवळ पोचला त्यावेळी तेथे जंक्शनवर वळण घेणाऱ्या टॅंकरची (जीए ०६ व्ही ९६६६) धडक त्याच्या मोटरसायकलला बसली. त्या धडकेत हसन दुचाकीसहीत खाली पडला असता टॅंकरचे एक चाक त्याच्या पायावर चढले. त्या अपघातात हसन गंभीररित्या जखमी झाला असून त्याला प्रथम चिखली येथील उपजिल्हा इस्पितळात नेण्यात आले असून नंतर त्याला पुढच्या उपचारासाठी बांबोळीच्या गोमॅकॉ इस्पितळात पाठवले. वास्को पोलीसांना अपघाताची माहीती मिळताच त्यांनी त्वरित घटनास्थळावर दाखल होऊन अपघाताचा पंचनामा केला. अपघातात सापडलेल्या टॅंकर चालकाचे नाव बी ए लोकेश (कर्नाटक) असे असल्याची माहीती पोलीसांकडून मिळाली. वास्को पोलीस स्थानकाचे हवालदार आशीष नाईक त्या अपघात प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.
वास्कोतून होणाऱ्या अवजड वाहतूकीमुळे निर्माण होणारे विविध त्रास भविष्यात दूर व्हावे यासाठी वास्कोत अवजड इत्यादी वाहतूकीसाठी उड्डाण पूल (फ्लाई ओव्हर) बांधण्याचे काम चालू आहे. बुधवारी सकाळी टॅंकर आणि दुचाकीचा अपघात होऊन ५५ वर्षीय हसन हजरथ्थी गंभीर रित्या जखमी झाल्यानंतर तेथे उपस्थित असलेल्या लोकांनी त्या उड्डाणपूलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करून वाहतूकीसाठी तो खुला करावा अशी मागणी केली.