वास्को - पहाटे दक्षिण गोव्यातील शांतीनगर - मांगोरहील महामार्गावर चारचाकीने भरधाव वेगाने येऊन येथून जाणाऱ्या तीन पादचाऱ्यांना जबर धडक दिल्याने यात ४४ वर्षीय हुरीलाल जैस्वाल याचा मृत्यू झाला. या अपघातात जखमी झालेला सुभाष पाटील व श्वेता पाटील यांच्यावर इस्पितळात उपचार चालू आहे. अपघातानंतर चारचाकी चालक पेक्श्टन परेरा यांने वाहनासहीत घटनास्थळावरून पलायन केले, मात्र नंतर पोलीसांनी त्याचा शोध लावून त्याला ताब्यात घेऊन अपघातातील वाहनही जप्त केले.वास्को पोलीसांनी दिलेल्या माहीतीनुसार बुधवारी पहाटे ६ च्या सुमारास हा अपघात घडला. नवेवाडे, वास्को येथे राहणारा हुरीलाल जैस्वाल तसेच सुभाष पाटील व श्वेता पाटील दाबोळी विमानतळ परिसराकडून नवेवाडे भागात जाण्यासाठी चालत जात होते. जेव्हा ते तिनही पादचारी शांतीनगर महामार्गाच्या रस्त्याच्या बाजूने चालत जात होते त्यावेळी भरधाव वेगाने आलेल्या ह्यइकोह्ण चारचाकीने त्यांना मागून जबर धडक दिली. या अपघातात हुरीलाल गंभीर रित्या जखमी होण्याबरोबरच सुभाष व श्वेता यांनाही जखमा झाल्या. भरधाव वेगाने वाहन चालवताना आपल्याकडून अपघात होऊन तीन पादचारी जखमी झाल्याचे पेक्श्टन (वय ४७, रा: मांगोरहील - वास्को) ला समजताच त्यांनी घटनास्थळावरून वाहनासहीत पोबारा काढला.अपघातात जखमी झालेल्या हुरीलाल तसेच इतर दोघांनाही उपचारासाठी चिखली उपजिल्हा इस्पितळा नेले असता हुरीलाल मरण पोचल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. अपघाताची माहीती पोलीसांना मिळताच त्यांनी त्वरित कारवाई करून अपघातानंतर पोबारा काढलेला वाहन चालक पेक्श्टन याला त्याच्या घराकडून ताब्यात घेऊन अपघातात शामील असलेली चारचाकी जप्त केली. अपघातावेळी चालक दारूच्या नशेत होता का हे जाणून घेण्यासाठी पोलीसांनी त्याची वैद्यकीय तपासणी केल्याची माहीती सूत्रांनी दिली. पोलीसांनी पैक्श्टन ला अटक केली असून याप्रकरणात अधिक तपास चालू आहे.
भरधाव वेगाने आलेल्या चारचाकीने तीन पादचाऱ्यांना ठोकरले, एकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2021 6:46 PM