- नारायण गावस
पणजी: चिंबल येथील जंक्शनवरील उड्डाण पुलाचे काम सुरु असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. येत्या जूनपर्यंत उड्डाण पूलाची एक बाजू पूर्ण होणार, असे सांताक्रूझचे आमदार रुदाल्फ फर्नांडिस यांनी सांगितले. यावर्षी ओल्ड गोवा येथे होणाऱ्या शवप्रदर्शनात पोप फ्रान्सिस गोव्यात येत असल्याने सांताक्रूझहून ओल्ड गोवा जाणारे सर्वच रस्ते सुरळीत केले जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.
सध्या विविध ठिकाणी विकासकामे सुरु असल्याने खोदकामे सुरु आहे. सांताक्रुझ मतदार संघात विविध ठिकाणी कामे सुरु आहे. चिंबल उड्डाण पुलाचे काम जोरात सुरु आहे. येत्या जूनपर्यंत त्याचा एक भाग पूर्ण होणार असून यामुळे काही प्रमाणात वाहतूक कोंडी कमी होणार आहे. तसेच इतर सर्व सांताक्रुझ मतदार संघाच्या रस्त्याचे डांबरीकरण इतर विकासाची आहे.
आमदार रुदाल्फ म्हणाले, सध्या सांताक्रुझ मतदार संघात विविध कल्वर्टची कामे सुरु आहेत. जवळपास ३.५ कोटी खर्च करुन दोन कल्वर्टची बांधकामे केली जात आहे. आणखी ३ कल्वर्ट बांधले जाणार आहेत. जर हे कल्वर्ट बांधले नाहीतर पावसाचे पाणी आमच्या शेतजमनीत साठून शेताची नाशाडी होणार आहे. गेली अनेक वर्षे हे कल्वर्ट बांधले नव्हते. त्यामुळे शेतीबागायतीत पावसाचे पाणी साचत होते. आता पूर्ण पाणी दर्याला मिळणार आहे. त्यामुळे हे कल्वर्ट महत्वाचे आहे. मुख्यमंत्री तसेच जलस्त्रोत मंत्री यांनी कामांसाठी चांगला पाठिंबा दिला आहे.