- सदगुरू पाटील
पणजी - 49 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (इफ्फी) उद्घाटन होण्यासाठी आता फक्त 24 दिवसांचा कालावधी बाकी आहे. इफ्फीसाठीची प्रतिनिधी नोंदणी जोरात सुरू आहे. दिवाळी झाल्यानंतर पणजीत इफ्फीचा माहोल दिसण्यास आरंभ होईल, असे मानले जात आहे.
इफ्फीसाठी प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधींना कार्डे वितरित करण्याचे काम दि. 16 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. दि. 10 नोव्हेंबर्पयत अर्ज स्वीकारले जातील. इफ्फीचे प्रतिनिधी होण्यासाठी देश- विदेशातून हजारो अर्ज सध्या सादर झालेले आहेत, अशी माहिती मिळाली. भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवानिमित्ताने पणजी नगरी हळूहळू सजविली जात आहे. इफ्फी परिसरात रंगरंगोटीचे काम सुरू आहे. कला अकादमी व आयनॉक्स मल्टीप्लेक्स ह्या वास्तू गोवा मनोरंजन संस्थेच्या ताब्यात दि. 11 किंवा 12 नोव्हेंबरला दिल्या जाणार आहेत. इफ्फीच्या तयारीच्या कामावर मनोरंजन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमेय अभ्यंकर हे लक्ष ठेवून आहेत. मुख्यमंत्री मनोहर र्पीकर हे आजारी असल्याने इफ्फीच्या तयारीच्या पातळीवर पूर्वीसारखी धावपळ दिसत नाही. अन्य मंत्री व आमदारांना इफ्फीच्या आयोजनात मोठासा रस नाही. मनोरंजन संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र तालक हेही वेगळ्य़ा कामात व्यस्त आहेत. मात्र इफ्फीशीसंबंधित विविध अधिकारी इफ्फीच्या कामात व्यस्त असल्याचे दिसून येते. यंदाच्या इफ्फीसाठी इवेन्ट मॅनेजमेन्टचे कंत्रट मिळविण्यासाठी अनेक कंपन्या इच्छुक असून त्यांच्यात स्पर्धा सुरू झाली आहे.
इफ्फीचे उद्घाटन व समारोप सोहळा बांबोळी येथील श्यामाप्रसाद मुखर्जी सभागृहात होणार आहे. 28 रोजी समारोप होईल. 50 वा इफ्फी पुढील वर्षी स्वतंत्र संकुलात पार पाडायला हवा अशी सरकारची योजना आहे. त्यासाठी दोनापावल येथे स्वतंत्र इफ्फी संकुल बांधले जाईल. त्याबाबतचे काम सुरू असून यापुढे निविदा जारी केली जाणार आहे.