पूजा नाईक प्रभूगावकर, पणजी: गृह खात्यात काम करणाऱ्या गृहरक्षकांना ना वैद्यकीय सुविधा ना वेळेत पगार मिळतो. उलट ३० दिवसांएवजी त्यांना केवळ २६ दिवसांचाच पगार दिला असून हा एक घोटाळा असल्याचा आरोप प्रदेश कॉंग्रेसचे प्रवक्ते विजय भिके यांनी पत्रकार परिषदेत केली.
गृहरक्षकांना प्रती दिन ८२४ इतका पगार दिला जातो. मात्र रजा वगैरे वजा करुन त्यांना केवळ २६ दिवसांचा पगार मिळतो. याचाच अर्थ गृह खात्यातील गृहरक्षकांच्या पगारातील महिन्याचे ४८ लाख रुपये जातात कुठे. तर वर्षाचे ६ कोटी रुपये होतात असा आरोपही त्यांनी केला.
भिके म्हणाले, की सरकार केवळ नोकऱ्या देण्याच्या बाता करीत असून प्रत्यक्षात रोजगार देत नाही. त्यामुळे सरकारने राज्यातील किती युवकांना नोकऱ्या दिल्या याची आंकडेवारी जारी करावी. सरकारी खात्यांमध्ये तर रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांकडून काम करुन घेतले जाते, मात्र त्यांना कुठल्याही सुविधा मिळत नाही. याचे उत्तम उदाहरण म्हणजे गृह खाते. या खात्यात काम करणाऱ्या गृहरक्षकांना ईएसआय नाही, वैद्यकीय सुविधा नाही. तर पगार सुध्दा वेळेत मिळत नाही. त्यांच्या पगाराचा दिवस हा महिन्याची ७ तारीख असली तरी प्रत्यक्षात पगार २० तारखेला मिळतो असा आरोप त्यांनी केला.