लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : दक्षिण गोव्यात बहुतांश लोकांची तहान भागविणारे राज्यातील सर्वात मोठे जलाशय असलेल्या साळावली धरणात केवळ ३५ टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिले आहे. त्यामुळे गोमंतकीयांना पाण्याचा जपून वापर करावा लागणार आहे.
हवामान खात्याचा मान्सूनविषयक अंदाज लक्षात घेता, या शिल्लक ३५ टक्के पाण्यात उर्वरित ३५ दिवस भागविण्याचे आव्हान आहे. साळावली धरणाची पूर्ण क्षमता ही २३,४३६ हेक्टामीटर आहे. १ टक्का पाणी म्हणजे २३४.३६ हेक्टामीटर. सध्याच्या पाणी साठ्याच्या हिशेबाने ३५ टक्के साठा हा ८२०२ हेक्टामीटर असा होतो.
जलस्रोत खात्याच्या नोंदीनुसार साळावलीत सव्वाआठ हजार हेक्टामीटर पाणीसाठा शिल्लक आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार मान्सून यंदा गोव्यात वेळेवर म्हणजे ४ ते ५ जूनपर्यंत पोहोचणार आहे. त्यामुळे मान्सूनला गोव्यात दाखल होण्यासाठी ३५ दिवस आहेत आणि ३५ टक्के उपलब्ध असलेल्या पाण्याच्या साठ्यात तोपर्यंत भागवावे लागणार आहे.
राज्यातील दुसरे मोठे धरण असलेल्या अंजुणेमध्ये क्षमतेच्या ३९ टक्के म्हणजेच १०६९ हेक्टामीटर पाणीसाठा शिल्लक आहे. काणकोणचे चापोली धरण निम्मे आटले असून ५५९ हेक्टामीटर पाणी शिल्लक आहे. ५८५ हेक्टामीटर क्षमतेच्या आमठाणे धरणात ३४ टक्के इतके म्हणजेच २०० हेक्टामीटर पाणी शिल्लक आहे. आमठाणे प्रकल्पात ११४ हेक्टामीटर तर गावणे प्रकल्पात ८७ हेक्टामीटर पाणी शिल्लक आहे.
तिळारीचा दिलासा
तिळारीचे विशाल जलाशय हे गोव्यासाठी दिलासादायक आहे. हे धरण महाराष्ट्रात जरी असले तरी या धरणाच्या ७४ टक्के पाण्याचा वापर हा गोव्यासाठीच आहे. तसेच ४६ हजार हेक्टामीटर पाण्याच्या क्षमतेच्या या धरणात अजूनही १८ हजार हेक्टामीटरपेक्षा अधिक पाणी शिल्लक आहे. त्यामुळे विशेषतः उत्तर गोव्यासाठी ही अत्यंत आश्वासक बाब आहे.
साळावली धरणात ३५ टक्के पाणी शिल्लक असले तरी या धरणाची क्षमताच फार मोठी असल्यामुळे हे ३५ टक्के पाणी पावसाळ्यापर्यंत पुरणार आहे. शिवाय मान्सून गोव्यात दाखल होण्यापूर्वी मान्सूनच्या पूर्वसरी गोव्याला दिलासा देतील. - सुभाष शिरोडकर, जलस्रोत मंत्री