लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली : डिचोली तालुक्यातील तिन्ही मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीसाठी भाजप अतिशय मजबूत स्थितीत सज्ज असून, उमेदवार कोण हा मुद्दाच नसेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या पद्धतीने देशाला मोठी उंची तसेच सुरक्षितता व विकास या बाबतीत केलेली कामगिरी हाच मुद्दा आहे. त्यामुळे तालुक्यात भाजपला विक्रमी मते मिळतील अशी भाजपला अपेक्षा आहे. असे असले तरीही आरजी, काँग्रेस व इतर पक्षांच्या कार्यकर्त्यांनी गृहीत धरणे चुकीचे ठरेल अशा प्रतिक्रियाही व्यक्त होत आहेत.
डिचोली भाजप अध्यक्ष विश्वास गावकर, साखळी अध्यक्ष गोपाळ सुर्लकर यांनी सांगितले की, भाजपचे काम सुरूच आहे. उमेदवारी कोणालाही मिळाली तरी भाजप नक्कीच मोठी आघाडी घेण्यास सज्ज आहे. आज अशी स्थिती आहे की, भाजप मोठी मुसंडी मारणार असल्याचे तुळशीदास परब, संजय नाईक, सचिन साळकर यांनी सागितले.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, आमदार प्रेमेंद शेट, डिचोली आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये भाजपसाठी तळमळीने कार्यरत आहेत. त्यामुळे कानोसा घेता भाजप तालुक्यात मजबूत असल्याचे चित्र दिसत आहे. भाजपसाठी उमेदवार कोण हा मुद्दाच नसल्याच्या प्रतिक्रिया आहेत. काहींनी नवीन उमेदवार असावा, अशी प्रतिक्रिया दिली. तरीही विद्यमान खासदार श्रीपाद नाईक यांना उमेदवारी दिली तरही त्यांच्यासाठी कार्य करणार असल्याचे सांगितले.
तालुक्यात काँग्रेस पक्षाने बैठकांचे सत्र सुरू केलेले असून, डिचोली व साखळीतील काँग्रेस कार्यकर्ते सक्रिय होताना दिसतात. साखळीत काँग्रेसने विधानसभा निवडणुकीत समाधानकारक मजल मारली होती, संघटन मजबूत करण्याचे काँग्रेस नेत्यांनी ठरवले आहे. त्याचा कितपत प्रभाव दिसून येणार हे येणाऱ्या काळात ठरेल. मात्र, काँग्रेसला गृहीत धरण्याची चूक कुणी करू नये. आमचे कार्य शिस्तबद्ध सुरू केले आहे, अशी प्रतिक्रिया माजी आमदार प्रताप गावस, प्रवीण ब्लेगन, आदींनी व्यक्त केली.
डिचोली तालुक्यात भाजपला टक्कर देणार तर संघटन मजबूत करण्यावर भर द्यावा लागेल, अशा प्रतिक्रिया ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केल्या आहेत. वस्तुस्थिती अशी आहे की, मागील वर्षभरापासून भारतीय जनता पक्षाचे कार्य अविश्रांत सुरू आहे. त्यामुळे त्यांचे संघटन कौशल्य मजबूत आहे. त्याचे लाभ भाजपला नक्कीच होईल, अशी प्रतिक्रिया वल्लभ साळकर, कालिदास गावस, सुभाष मळीक यांनी व्यक्त केली. आरजीच्या मनोज परब यांनी तालुक्यात काही मते मिळवली होती. युवा शक्तीचा एक घटक त्यांच्याकडे आहे. मात्र, संघटन मजबूत करणे, सामाजिक उपक्रम व लोकांना विशेष विश्वासात घेण्याचे कसब त्यांना साधावे लागेल. त्यांचे अनेक मुद्दे चर्चेत आहेत. मात्र, त्यासाठी प्रचाराची रणनीती व लोकसहभाग वाढवण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया त्यांचे समर्थक बोलून दाखवतात.
आजच्या परिस्थितीत अयोध्येत राम मंदिर उभारणी मुद्दा महत्त्वाचा ठरलेला असून, सारा देश राममय झालेला आहे. त्याचा मोठा लाभ हा भाजपला होईल, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही, असे ज्येष्ठ नागरिक सूर्यकांत देसाई यांनी सांगितले.