पणजी : भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा (इफ्फी) पडदा उघडण्यासाठी आता केवळ एक दिवस क्षिल्लक आहे. बांबोळी येथील श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममधील सभागृहात उद्घाटन सोहळ्य़ासाठी मुख्य व्यासपीठ तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. शनिवारी पोलीस यंत्रणा तसेच अग्नी शामक दलाच्या जवानांनी सुरक्षेच्यादृष्टीने स्टेडियमच्या ठिकाणी तसेच अन्य इफ्फीस्थळीरंगीत तालीम केली.
पणजीनगरी सध्या इफ्फीमय झालेली आहे. पणजी व परिसरातील 90 टक्के हॉटेलांमधील खोल्या इफ्फीच्या प्रतिनिधींसाठी आरक्षित झालेल्या आहेत. देश- विदेशातून प्रतिनिधी येण्यास रविवारी सायंकाळपासून आरंभ होईल. इफ्फीच्या आयोजकांकडून प्रतिनिधींना ओळखपत्रे वितरित करण्यास शुक्रवारपासून आरंभ झाला आहे. सात हजारपेक्षा जास्त प्रतिनिधी यावेळी इफ्फीत सहभागी होणार आहेत.
इफ्फीचा उद्घाटन सोहळा येत्या 20 रोजी सायंकाळी बांबोळी येथील श्यामाप्रसाद मुखर्जी सभागृहात होईल. या स्टेडियमच्या सभागृहात शनिवारी दिवसभर उद्घाटन सोहळ्य़ासाठीचे व्यासपीठ तयार करण्याचे व ते सजविण्याचे काम सुरू होते. सुमारे शंभर कामगार, कर्मचारी व अन्य मनुष्यबळ या कामात गुंतले असल्याचे दिसून आले. विविध प्रकारची रोषणाई आणि सजावट व्यासपीठाच्या ठिकाणी करण्यात आली आहे. सोमवारी सकाळर्पयत शंभर टक्के सजावटीचे काम पूर्ण होईल.
इफ्फीच्या उद्घाटन सोहळ्य़ाला केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रलयाच्या मंत्री स्मृती इराणी, मुख्यमंत्री मनोहर र्पीकर यांच्यासह अनेक महनीय व्यक्ती उपस्थित असतील. बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या हस्ते उद्घाटन होईल. त्या शिवाय अनेक सिने कलावंत उपस्थित असतील. स्टेडियमच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था कडेकोट असेल. पोलिसांनी शनिवारी स्टेडियमसह सर्व इफ्फीस्थळी सुरक्षेच्यादृष्टीने रंगीत तालिम केली. अग्नी शामक दलाची गाडीही आणून ठेवण्यात आली आहे. सश पोलिसांनी कुठे रहावे, अग्नी शामक दलाची जवान आणि गाडी कुठे कुठे ठेवावी, रुग्णवाहिका कुठे ठेवाव्यात वगैरे सूचना अधिका:यांनी संबंधितांना शनिवारी केल्या आहेत. पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकानेही (एटीएस) सर्व इफ्फीस्थळांवर फिरून सुरक्षेच्यादृष्टीने आवश्यक ती चाचणी केली आहे व खबरदारी घेतली आहे. कदंब वाहतूक महामंडळाने आपल्या चार बसगाडय़ा इफ्फीच्या सेवेसाठी दिल्या आहेत.
पणजी शहरातील मांडवी नदीवरील दोन्ही पुल, बांदोडकर मार्ग, कला अकादमी परिसर, मुख्य इफ्फीस्थळ आदी सगळीकडे रोषणाई करण्यात आली आहे. रोषणाई व अन्य सजावट पर्यटकांसाठीही आकर्षण बनले आहे. इफ्फीनगरी आज रात्रीपासून विशेष शोभून दिसणार आहे.
वादाची किनार पण..
दरम्यान, काही सिनेमा वगळण्याच्या विषयावरून इफ्फीला वादाची किनार लाभलेली असली व गोव्यातील कलाकारांमध्येही त्याविषयी उलटसुलट भावना असल्या तरी, गोव्यातील कलाकारांनी इफ्फीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलेला नाही. पदमावती सिनेमाच्या विषयावरून कलाकारांना धमक्या आल्याने शबाना आझमी यांनी बॉलिवूडमधील मंडळींना इफ्फीवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे.
गोवा सरकारने इफ्फीस्थळी आंदोलने होऊ नयेत म्हणून खबरदारी घेतली आहे. फक्त पूर्व परवानगी घेऊन आझाद मैदान व कांपाल परेड मैदान अशा दोन्हीच ठिकाणी कुणीही निषेधात्मक कार्यक्रम करू शकतात.