पणजी : ज्या दुचाकीस्वाराजवळ हेल्मेट नाही, त्या दुचाकीस्वारास पेट्रोल द्यायचे नाही ही महाराष्ट्रातील योजना चांगली आहे. गोव्यातही कायद्यानुसार व नियमांनुसार ही योजना राबविता येईल काय यावर विचार केला जाईल, असे वाहतूक मंत्री सुदिन ढवळीकर यांनी सांगितले.ज्या दुचाकीस्वाराजवळ हेल्मेट नाही त्या दुचाकीस्वारास महाराष्ट्रात कुठेच पेट्रोल पंपवर इंधन भरू दिले जाणार नाही, असे महाराष्ट्राचे राज्य वाहतूक मंत्री दिवाकर रावते यांनी जाहीर केले आहे. याविषयी गोव्याचे वाहतूक मंत्री ढवळीकर यांना लोकमतने विचारले असता, ते म्हणाले की अशा प्रकारच्या योजनेमुळे अधिकाधिक दुचाकीस्वार हेल्मेटचा वापर करू लागतील. निदान पन्नास टक्के तरी दुचाकीस्वार यामुळे हेल्मेट परिधान करतील व परिणामी दुचाकीस्वारांचे अपघातात जाणारे बळी टळतील. मात्र गोव्यात अशा प्रकारचा निर्णय अंमलात आणण्यापूर्वी कायद्यानुसार ते शक्य आहे काय, मोटर वाहन कायद्यात तशी तरतुद आहे का व ते नियमास धरून होईल काय या दृष्टीकोनातून आम्हाला विचार करावा लागेल.मंत्री ढवळीकर म्हणाले, की महाराष्ट्रात जर अंमलबजावणी होत असेल तर ते स्तुत्यच म्हणावे लागेल. मात्र गोव्यात तसा निर्णय लागू करताना प्रथम कायद्याचा विचार करावा लागेल, कारण उद्या कुणीही न्यायालयात जाऊन त्यास स्थगिती आणू शकतो. तसे होऊ नये म्हणून काळजी घेऊन सरकार हेल्मेट नाही तर पेट्रोल नाही या योजनेबाबत विचार करील.दरम्यान, पेट्रोलपंप पुरवठादारांच्या संघटनेस मुंबई पोलिसांनी हेल्मेट नसलेल्या दुचाकीस्वारास महाराष्ट्रात पेट्रोल मिळणार नाही याची काळजी येत्या दि. 1 ऑगस्टपासून घ्यावी, असा आदेश् दिला आहे.
हेल्मेट असेल तरच पेट्रोल मिळेल - महाराष्ट्रातील योजना चांगली - सुदिन ढवळीकर
By admin | Published: July 21, 2016 7:35 PM