ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. 18 - भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी पुन्हा एकदा सक्रिय झाला असल्याची माहिती संशोधकांनी दिली आहे. अंदमान आणि निकोबार बेटावर असलेल्या या ज्वालामुखीमधून राख निघण्यास सुरुवात झाली आहे. 150 हून अधिक वर्ष शांत असलेला हा ज्वालामुखी 1991 मध्ये सक्रिय झाला होता.
समुद्रशास्त्र विज्ञान संस्थेमधील संशोधकांनी सांगितल्याप्रमाणे, 'अंदमान आणि निकोबार बेटावर असलेला एकमेव जिवंत ज्वालामुखी पुन्हा सक्रिय झाला आहे. बॅरन बेटावर स्थित असलेला हा ज्वालामुखी पोर्ट ब्लेअरपासून 140 किमी उत्तर-पूर्वकडे आहे. 150 वर्ष शांत असलेला हा ज्वालामुखी 1991 मध्ये सक्रिय झाल्यानंतर थांबून थांबून जागा होत आहे'. ज्वालामुखी सक्रिय झाल्याने यामधून लाव्हा आणि धूर बाहेर येत असल्याचं अभय मुधोळकर यांच्या नेतृत्वातील संशोधकांच्या टीमने सांगितलं आहे.
'23 जानेवारी 2017 रोजी संशोधकांची एक टीम समुद्रातील काही नमुने चाचणीसाठी गोळा करत असताना अचानक ज्वालामुखीतून राख बाहेर येताना दिसू लागली. यानंतर ही टीम तेथून एक मैल दूर गेली आणि निरीक्षण सुरु केलं. पाच ते दहा मिनिटाच्या अंतराने त्यांना बदल जाणवत होते. ही राख दिवसाच्या उजेडात स्पष्टपणे दिसत आहे', अशी माहिती देण्यात आली आहे.