लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : भाजपच्या प्रदेश निवडणूक समितीची बैठक काल होऊन उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघातून संभाव्य उमेदवारांची नावे दिल्लीला पक्षाच्या संसदीय मंडळाकडे पाठवण्यासाठी निश्चित करण्यात आली. केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक व अन्य दोन नावे पाठवण्यात येणार असली तरी उमेदवारी श्रीपाद यांनाच दिली जाण्याचे संकेत मिळत आहेत.
पक्षाचे गोवा निवडणूक प्रभारी आशिष सूद, मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे व इतर बैठकीला उपस्थित होते. दक्षिण गोव्यातून याआधीच पाच नावे केंद्रीय नेत्यांना पाठवली आहेत. काल उत्तर गोव्यातील उमेदवारांच्या नावांबाबतच चर्चा करण्यासाठी बैठक बोलावण्यात आली होती.
उत्तरेतून पाचवेळा लोकसभेवर निवडून आलेले श्रीपाद नाईक यांचे तसेच माजी आमदार दयानंद सोपटे व दिलीप परुळेकर, दयानंद मांद्रेकर यांचीही नावे पाठवली जातील, अशी माहिती मिळते.
उत्तरेत एकापेक्षा जास्त नावे : तानावडे
बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे म्हणाले की, उत्तर गोव्यातून एकापेक्षा जास्त नावे आम्ही पाठवलेली आहेत. निवडणूक जाहीर होण्याआधी आमचे दोन्ही मतदारसंघातील उमेदवार जाहीर होतील.
दक्षिणेबाबत उत्कंठा
दरम्यान, काँग्रेस-आप युतीमुळे बदललेल्या राजकीय स्थितीच्या पार्श्वभूमीवर खास करुन दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघात भाजप कोणाला उमेदवारी देतो काँग्रेसकडून कोणत्याही परिस्थितीत काबीज करण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. त्यात शनिवारी आपने दोन्ही जागांवर कॉग्रेसी उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला, त्यामुळे भाजपमध्ये पुढील रणनीती ठरविण्यासाठी खल सुरु झाला.
दक्षिणसाठी पाच नावे
आमदार दिगंबर कामत व सभापती रमेश तवडकर यांनी आपण लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक नसल्याचे स्पष्ट केले असले तरी या दोघांसह अॅड. नरेंद्र सावईकर, माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर व पक्षाचे प्रदेश सरचिटणीस दामू नाईक अशी पाच नावे प्रदेश निवडणूक समितीने केंद्रीय नेत्यांकडे पाठवलेली आहेत. उमेदवार पक्षाच्या केंद्रीय संसदीय मंडळाकडूनच जाहीर केला जाणार आहे. दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघात भाजपने याआधी सर्वेक्षण करुन घेतलेले आहे त्यानुसार उमेदवारी दिली जाईल.
दुसरी बाब म्हणजे खिस्ती मतदारांची संख्या लक्षणीय असलेल्या सासष्टी तालुक्याला नुवेंचे आमदार आलेक्स सिक्वेरा यांच्या रुपाने मंत्रीही दिला आहे.
निर्णय दिल्लीत : मुख्यमंत्री
मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले की, आम्ही उत्तर गोवा मतदारसंघातून नावे पाठवत आहोत. परंतु नावांची ही केवळ शिफारस आहे. अंतिम निर्णय दिल्लीत पक्षाचे केंद्रीय संसदीय मंडळच घेणार आहे.
२९ रोजी घोषणा शक्य
भाजप सूत्रांनी दिलेल्या खात्रीलायक माहितीनुसार, येत्या गुरुवारी २९ रोजी पक्षाचे केंद्रीय संसदीय मंडळाची दिल्लीत बैठक होणार असून गोवा, पुढेचेरी, मणिपूर आदी लहान राज्यांचे उमेदवार जाहीर केले जाणार आहेत.
काँग्रेसची उमेदवार छाननी समितीची उद्या होणार बैठक
काँग्रेसच्या उमेदवार छाननी समितीची बैठक उद्या, मंगळवारी दिल्लीत होणार आहे. या बैठकीत दोन्ही मतदारसंघातील उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. उत्तर गोव्यात माजी केंद्रीय मंत्री अॅड. रमाकांत खलप फ्रंट रनर आहेत. विजय भि केयांच्याही नावाची चर्चा आहे. दक्षिण गोव्यात विद्यमान खासदार फ्रान्सिस सार्दिन यांना डावलले जाऊन नवीन चेहरा दिला जातो का, याबद्दल उत्कंठा आहे. फेब्रुवारी २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने ८० टक्के नवे चेहरे दिले होते. येत्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने बूथ जोडो अभियान सुरु केले असून प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर व अन्य नेत्यांनी काल फातोर्डा येथील एका हॉटेलमध्ये बूथ समन्वयकांना मार्गदर्शन केले.