पणजी : निर्यात वाढवणे आणि आयात कमी करणे हा देशभक्ती आणि ‘स्वदेशी’साठी नवा मार्ग आहे आणि पेट्रोल किंवा डिझेलची एक थेंबही आयात केली जाणार नाही तेव्हा हे भारतासाठी ‘नवे स्वातंत्र्य’ असेल, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी सांगितले.
‘पांचजन्य’ साप्ताहिकाने आयोजित केलेल्या ‘सागर मंथन २.०’ कार्यक्रमाला संबोधित करताना केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री म्हणाले की, पेट्रोल आणि डिझेलची आयात थांबवणे हे जगातील दहशतवादाला अटकाव करण्याशी जोडलेले आहे. जोपर्यंत ही आयात थांबत नाही, तोपर्यंत जगभरातील दहशतवाद थांबणार नाही. पेट्रोल आणि डिझेलची आयात थांबवणे हे माझ्या जीवनाचे ध्येय आहे. पेट्रोल आणि डिझेलचा एक थेंबही आयात होणार नाही त्या दिवशी आपल्या देशाला नव्याने स्वातंत्र्य मिळाले, असे मी मानेन असेही गडकरी यावेळी बोलताना म्हणाले.