किशोर कुबल
पणजी :
आसगांव येथील वादग्रस्त ‘सिली सोल्स बार अॅण्ड रेस्टॉरण्ट’ प्रकरणी गोव्यातील समाजकार्यकर्ते अॅड. आयरिश रॉड्रिग्स यांनी केंद्रीय महिला, बाल कल्याणमंत्री स्मृती इराणी यांना खुल्या चर्चेचे आव्हान दिले आहे.
या बारसाठी मृत व्यक्तीच्या नावावर परवाना घेण्यात आला तसेच बारचे बांधकामही बेकायदा असल्याच्या आपल्या आरोपांवर आयरिश हे ठाम आहेत. बेकायदा परवाना प्रकरणी त्यांनी गोवा अबकारी आयुक्तांकडे तक्रार केली असून त्यावर सुनावणी चालू आहे.
स्मृती इराणी यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावलेले असून या बारशी आपला संबंध नसल्याचे जाहीर केले आहे. त्यावर आता आयरिश यांनी हिंमत असेल तर इराणींना खुल्या व्यासपीठावर या विषयावर चर्चेसाठी यावे, असे आव्हान दिले आहे. आयरिश म्हणाले की, ‘ हे बार इराणी यांच्या मालकीचे आहे किंवा बार परवाना इराणींच्या कुटुंबातील सदस्याच्या नावावर आहे असा दावा मी कुठेही केलेला नाही. मी एवढेच म्हटले आहे की, केंद्रीय मंत्री स्मृती इराणींचे कुटुंबीय चालवत असलेले बार बेकायदा आहे आणि त्या संबंधीचे पुरेसे पुरावे उपलब्ध आहेत.