म्हापसा अर्बनच्या फाईल्स खुल्या कराच; काँग्रेसचे उमेदवार खलप यांचे आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2024 12:56 PM2024-05-01T12:56:24+5:302024-05-01T12:57:32+5:30
चौकशीस सामोरे जाण्यास तयार
लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली: म्हापसा अर्बन बँक स्थापन केल्यानंतर या बँकेतून कर्ज देताना आम्ही सर्व ती खबरदारी घेतली होती. योग्य सुरक्षा हमी घेऊनच कर्जे दिलीत. सर्व व्यवहार चोख आहेत त्यामुळे म्हापसा अर्बन बँक प्रकरणी मागून आरोप करण्यापेक्षा समोर यावे. आपण आजही खुल्या मंचावर या विषयी चर्चेसाठी तयार आहे. मुख्यमंत्र्यांनीही बिनधास्तपणे फाईल्स खुल्या कराव्यात, असे काँग्रेसचे उमेदवार अॅड. रमाकांत खलप यांनी साखळीत काँग्रेसच्या सभेत स्पष्ट केले.
साखळीतील या प्रचारसभेला व्यासपीठावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, महाराष्ट्रातील नेते संभाजीराव मोहिते, शिवसेना (उबाठा) चे राज्यप्रमुख जितेश कामत, आपचे राजेश कळंगुटकर, गोवा फॉरवर्डचे संतोषकुमार सावंत, नगरसेवक प्रवीण ब्लेगन, माजी आमदार प्रताप गावस, सदानंद मळीक, माजी नगराध्यक्ष धर्मेश सगलानी, राजेश सावळ, सुनीता वेरेकर, साखळीचे गटाध्यक्ष मंगलदास नाईक, डिचोलीचे गटाध्यक्ष मनोज नाईक, मयेचे गटाध्यक्ष बाबी च्यारी आदी उपस्थित होते.
अॅड. खलप म्हणाले, आपण मगो पक्षात असताना भाजप नुकताच गोव्यात धडपडत होता. त्यावेळी भाजपचे आमदार निवडून यावे यासाठी प्रयत्न केले. आजचे खासदार श्रीपाद नाईक यांना मडकई मतदारसंघातून निवडून आणण्यासाठी ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यासमवेत मीही प्रचार केला आहे. गोव्यात भाजपला आपल्या पक्षाचा विरोध डावलून आपण बोट दिले. आज तेच आपल्याच विरोधात बोलत आहेत.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर म्हणाले, १५ लाख रुपये खात्यांवर येणार, गोव्याला विशेष दर्जा देणार, केंद्रात भाजप सरकार येताच तीन महिन्यांमध्ये खाणी सुरू करण्याच्या घोषणांचे काय झाले ? असा सावल उपस्थित केला. साखळीचे गटाध्यक्ष मंगलदास नाईक यांनी स्वागत केले.