पणजी : पणजीच्या नागरिकांची ब-याच वर्षांपासूनची मळा येथील पुलाची मागणी बुधवारी पूर्ण झाली. तिस-या पुलामुळे बसस्थानकाकडे जाणारी वाहतूक सुरळीत होणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केले. एकूण 24 कोटींचा हा पूल आहे.बुधवारी मुख्यमंत्री पर्रीकर यांनी वाढदिवसाचे औचित्य साधून मळा ते पाटो प्लाझा असा रेड ब्रिज म्हणून ओळखल्या जाणा-या पुलाचे लोकार्पण केले. याप्रसंगी खासदार श्रीपाद नाईक, गोवा राज्य पायाभूत साधन-सुवधा विकास महामंडळाचे (जीएसआयडीसी) अध्यक्ष दीपक प्रभू पावसकर, आर्थिक विकास महामंडळाचे (ईडीसी) चेअरमन सिद्धार्थ कुंकळ्येकर, नगरसेवक मिनिन डिक्रूझ, नगरसेवक शुभम चोडणकर, रेखा कांदे, शीतल नाईक, भाजप मंडळाचे अध्यक्ष दीपक म्हापसेकर व जीएसआयडीसीच्या अधिका-यांची उपस्थिती होती.पर्रीकर म्हणाले की, पंचवीस वर्षापूर्वीचे या पुलाचे मळावासीयांचे स्वप्न आता पूर्ण झाले आहे. येथील जलवाहिनी दुसरीकडे स्थलांतरीत झाली असून, दुस-या पुलाच्या कामास लवकरच सुरुवात होईल. मळा, सांताक्रूझ आणि भाटलेतील नागरिकांना पणजीत आणि बसस्थानकाकडे जाण्यासाठी आता सोयीस्कर होणार आहे. उद्घाटनापूर्वी मुख्यमंत्र्यांनी पुलाची पाहणीही केली. याशिवाय दुस-या पुलाबाबत अधिका-यांनी येणा-या अडचणी त्यांच्या कानी घातल्या. उद्घटनानंतर पर्रीकर यांनी पुलावरून फेरफटका मारला याप्रसंगी येता-जाता लोक त्यांना वाढदिवासाच्या शुभेच्छा देत होते. वाहतुकीस पूल खुला झाल्यानंतर पोलीस खात्याचे वाहतूक विभागाचे निरीक्षक ब्रँडन डिसोझा यांनी सांताक्रूझकडून येणारी व बसस्थानकाकडे जाणारी वाहने या पुलावरून सोडण्यास सुरुवात केली.दरम्यान, 2016 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी पर्रीकर हे संरक्षणमंत्री असताना त्यांच्या काळात या पुलाच्या कामाची कोनशिला बसविली होती. त्या कामाची पूर्तता यावर्षी आता होऊन मुख्यमंत्री म्हणून पर्रीकर यांच्या हस्ते या पुलाचे उद्घाटन झाल्याची कोनशिला एकाच ठिकाणी लावल्या गेल्या आहेत. शुभारंभाला असणा-या पार्सेकरांची मात्र येथे बुधवारी उणीव होती, अन्यथा त्याचवेळचे सर्व मान्यवर उद्घाटनाला उपस्थित होते. दरम्यान, दोन लेनच्या पुलासाठी 24.24 कोटींची अंदाजीत खर्च असून, त्यातील एका लेनचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे एक मार्ग वाहतुकीस खुला झाला.
पणजीच्या उपनगरातील नवा पूल खुला, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2017 8:02 PM